अतुल कुलकर्णी, मुंबईकाँग्रेस पक्ष संघटनेच्या पदाचा राजीनामा देणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट वाटप करताना नेत्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करुन तिकीटे दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कामत यांना भेटीसाठी वेळ दिली होती. तसा निरोप एका नेत्याकडे दिला होता. त्या नेत्याने कामत यांना अनेक ठिकाणी शोधले. पण कामत उपलब्ध झाले नाहीत. उलट ज्यादिवशी राहुल गांधी यांनी बैठक बोलावली होती त्याच दिवशी कामत यांनी राजीनामा दिला. परिणामी श्रेष्ठींनी या कृतीविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे तो नेता म्हणाला. राजीनामा देताना श्रेष्ठी आपणास वेळ देत नसल्याचा आक्षेपही कामत यांनी राजीनामा पत्रात नोंदविला होता. ज्यावेळी कामत यांना पक्षाने संधी दिली त्या त्यावेळी त्यांनी त्या संधीच्या वेगळे मत मांडले. स्वच्छ भारत, किंवा ग्रामविकास विभागाचे महत्व आता एवढे चर्चेत आले. पण युपीए सरकारमध्ये ग्रामविकास विभागाचे विभाजन करुन कामत यांच्याकडे त्यावेळी हे खाते देण्याचे व त्या खात्याला सर्वात जास्त अधिकार देण्याची कल्पना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मांडली होती पण त्याहीवेळी कामत यांनी ती संधी नाकारल्याचे पक्षश्रेष्ठी विसरलेले नाहीत, अशी टिप्पणीही त्या नेत्याने केली.मुंबई महापालिका निवडणुका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली होणार असली तरी तिकीटासाठी आग्रह धरणाऱ्या नेत्यांना संबंधितांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. पक्षात वॉर्ड निहाय ब्लॉक अध्यक्षपद निर्माण करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१५ मध्येच झाला होता व तो सर्वांना मान्य होता. त्यामुळे निरुपम काहीतरी वेगळे करत आहेत असे नाही, तो निर्णय कसा योग्य होता असे त्यावेळी कामत यांनी ठासून सांगितले होते, अशी टिप्पणीही त्या नेत्याने नोंदवली.
गुरुदास कामत यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज
By admin | Published: June 21, 2016 3:37 AM