सोलापूर : थोर साक्षात्कारी संत गुरुदेव रानडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व पालखी सोहळ्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र निंबाळ येथे बुधवारी गुरुदेवांच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. अतिशय थाटात निघालेल्या मिरवणुकीत आणि पालखी सोहळ्यात निंबाळवासी आणि निंबर्गी संप्रदायाचे साधक मोठ्या संख्येने सहभागी होते.
पन्नास वर्षापूर्वी गुरुदेव आश्रम ते निंबाळ गाव असा पालखी सोहळा सुरू करण्यात आला होता. यंदा त्या सोहळ्याला ५० वर्षे पूर्ण झाली, याचे औचित्य साधून आज सकाळी सहा वाजता निंबाळ गावातून पालखी सोहळा सुरू झाला. खास मुधोळ येथून आणलेल्या हत्तीवर गुरुदेवांची मोठी प्रतिमा ठेवण्यात आली. या मिरवणुकीत १०८ सुवासिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. निंबाळ गावातून निघालेली मिरवणूक मारुती मंदिर रेल्वे स्टेशन मार्ग सकाळी साडेअकरा वाजता आश्रमात पोहोचली. त्यानंतर भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
वसंतराव पोद्दार यांनी पन्नास वर्षांपूर्वी पालखी सोहळा सुरू केला होता. त्यावेळी पूज्य सीताबाई रानडे व भक्त मंडळींना सोबत घेऊन ही परंपरा कायम ठेवली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी निंबाळ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुहास कुलकर्णी, सचिव नंदू देऊळकर, दीपक आपटे, गुरुदेव पोद्दार यांच्यासह सर्व ट्रस्टी, साधकांनी परिश्रम घेतले.