नागपूर : सध्या गोरक्षेच्या मुद्द्यावरून देशात अकारण मोठा वाद निर्माण करण्यात येत आहे. गोरक्षा व्हायलाच हवी; मात्र गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, उत्तेजित होऊन नाही, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला. काश्मीरच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आक्रमक भूमिका कायम ठेवावी, असे प्रतिपादनही त्यांनी या वेळी केले. नव्या गणवेशातील संघाच्या पहिला विजयादशमी उत्सव मंगळवारी सकाळी रेशीमबाग मैदान येथे पार पडला. या वेळी मुख्य अतिथी म्हणून १९७६च्या भारतीय आर्थिक सेवेचे अधिकारी सत्यप्रकाश राय हे उपस्थित होते. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली लष्कराने जे काम करून दाखवले ते अभिनंदनीय आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान असून, भारतीय जवानांनी पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे जगाच्या पाठीवर भारताची मान उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कूटनीतीमुळे पाकिस्तानला एकटे पाडण्यात यश आले आहे, अशा शब्दांत कौतुक करत सरसंघचालकांनी पंतप्रधानांची पाठ थोपटली. केंद्रातील व राज्यातील सध्याचे सरकार काम करणारे आहे, उदासीन नाही. अजून बरंच काम बाकी आहे, पण सध्या जे काम सुरू आहे ते पाहून देश खूप पुढे जाईल असा विश्वास जनतेला वाटतो, असे भागवत म्हणाले.सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच शारीरिक कवायती सादर केल्या. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पश्चिम क्षेत्र संघचालक जयंत भाई भाडेसिया, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक दिलीप लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे तसेच विदेशातून आलेले स्वामी ब्रह्मदेव, स्वामी आनंदगिरी, डॉ. टोनी, राजा लुईस हे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहावे
By admin | Published: October 12, 2016 6:53 AM