रामटेक (जि़ नागपूर) : प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी एका विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षकास अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास रामटेक येथील समर्थ विद्यालयात केली. प्रशांत राम येळणे (५०) असे लाचखोर शिक्षकाचे नाव आहे. रामटेकच्या समर्थ विद्यालयात तो एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. सध्या या अभ्यासक्रमाच्या बारावीच्या एईटीमध्ये २२ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्या विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण होण्याएवढे गुण देणे, गैरहजर विद्यार्थ्यांची हजेरी लावणे यासाठी तो विद्यार्थ्यांकडून एक हजार ते पाचशे रुपये घ्यायचा. यासोबतच पैसे न देणाऱ्या विद्यार्थ्यांना दमदाटी करणे, अनुत्तीर्ण करण्याची धमकी देणे असा प्रकार सुरू होता. याबाबत एका विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला टोल फ्री क्रमांकावरून सूचना दिली. शाळा परिसरात तक्रारदार विद्यार्थ्याकडून एक हजार रुपयांची लाच घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. (प्रतिनिधी)
गुरुजी, तुम्हीसुद्धा लाच घेतली!
By admin | Published: January 09, 2015 1:17 AM