सुरेश लोखंडे / ठाणेकोकण शिक्षक आमदारकीची निवडणूक नुकतीच झाली. यासाठी पाच जिल्ह्यांतील ३१ हजार ९५२ शिक्षकांनी मतदान केले. यातील १ हजार १०३ शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केले. यामुळे मतदान प्रक्रियेतील त्यांचे अज्ञान उघड झाले. कोकणच्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील ३७ हजार ६०४ शिक्षकांना कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क होता. यातील ८४.९८ टक्के म्हणजे ३१ हजार ९५२ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, यातील १ हजार १०३ शिक्षकांनी चक्क चुकीच्या पद्धतीने मतदान केले. लोकशाही पद्धतीच्या या मतदान प्रक्रियेत शिक्षकही अशा प्रकारे मतदान करून आपले अज्ञान सिद्ध करीत असल्याचे वास्तव या निवडणुकीतून उघड झाले आहे. निवडणुकीला उभ्या असलेल्या १० उमेदवारांना पसंती क्रमांक देऊन मतदान करणे अपेक्षित होते. पसंतीनुसार १० क्रमांक द्यायचे होते. पण, काही शिक्षकांनी नको तेथे क्रमांक लिहिला, उमेदवाराच्या तोंडावर स्वाक्षरी केली, उमेदवारांच्या तोंडावर खाडाखोड, दोन उमेदवारांच्या मध्ये बरोबरची खूण, दोघांना एकच क्रमांक, मतपत्रिकेवर खाडाखोड, दोन उमेदवारांना एकच पसंती क्रमांक, तोही अस्पष्ट देऊनही शिक्षकांनी मतदान केल्याचे समाधान करून घेतले. मात्र, ती बाद ठरवण्यात आल्यामुळे सुमारे १ हजार १०३ शिक्षकांचे मतदान अवैध म्हणून जाहीर करण्यात आले. कोकण शिक्षक आमदारकीसाठी विजयी झालेले बाळाराम पाटील यांच्यासह उर्वरित नऊ उमेदवारांना नापसंती दर्शवल्यांमध्ये ५२ शिक्षकांचा समावेश आहे. ‘नोटा’चा पर्याय वापरण्यासह अवैध ठरवलेले ११०३ शिक्षकांचे मतदान कोकण विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी बाद म्हणून जाहीर केले. वैध ठरवलेल्या ३० हजार ६९६ मतांपैकी विजयासाठी १५ हजार ३९९ अधिक एक म्हणजे १५ हजार ४०० मतदानाचा कोटा नऊ फेऱ्यांनंतरही पूर्ण झालेला नाही. यामुळे सर्वाधिक ११ हजार ८३७ मतदान मिळवलेल्या पाटील यांचा विजय झाला.
मतदानातून गुरुजींचे अज्ञान उघड, १ हजार १०३ शिक्षकांची मते बाद
By admin | Published: February 13, 2017 3:39 AM