- प्रज्ञा केळकर-सिंग, पुणेघरी अठराविश्वे दारिद्रय...पोटाची खळगी भरताना होणारी तगमग आणि पिढ्यानपिढ्यांचा वारसा जपण्यासाठी झगडणारी लोककलावंतांची मुले...तमाशा, लावणी कलावंत, वाघ्या मुरळी, वासुदेव, नंदीबैल, शाहीर, दशावतार, डोंबारी कलावंतांचे आणि त्यांच्या मुलांचे जीवन आजही उपेक्षित आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने अनुदानित आश्रमशाळा, गुुरुकूल स्थापण्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. याशिवाय लोकवंतांच्या मानधनात दीडपट वाढ करण्यास आणि विशेष पुरस्कार सुरु करण्यालाही त्यांनी संमती दर्शविली आहे. खेड्यापाड्यांतून, शहरातून विविध लोककला सादर करणारा लोककलावंत वर्षानुवर्षे उपेक्षितच राहिला आहे. सामान्यांप्रमाणे त्यांनाही शिक्षण मिळावे, यासाठी गुरुकूल, आश्रमशाळा सुरु व्हाव्यात, अशी मागणी अखिल भारतीय लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेने केली होती. या संदर्भात राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीने २० जानेवारीला मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव व पदाधिकारी उपस्थित होते. लोककलावंतांच्या मुलांसाठी पहिली ते दहावीचे शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा आणि गुरुकूल स्थापन केले जाणार आहे. यामध्ये सामान्य शाळांमधील अभ्यासक्रमांप्रमाणे लोककलांचे रीतसर शिक्षण दिले जाईल. ढोलकी, तबला, संगीत, गाण्याच्या प्रशिक्षणाचाही यात समावेश असेल. सकाळी ९ वाजता विविध विषय शिकवले जाणार असून दुपारच्या सत्रात लोककलांचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेकडून लोककलावंतांची यादी तयार केली जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक लवकरच काढले जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सध्या लोककलावंतांना नाममात्र मानधन दिले जाते. दर वर्षी २८ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद केली जाते. यात दीडपट वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मानधनासाठी अ,ब आणि क अशी विभागणी केली जाईल. सच्चे कलावंत आणि बोगस कलावंत यांची पडताळणी करण्यासाठी विभागवार चाचणी करण्यासाठी ३ सदस्यांची समिती नेमली जाणार आहे. १ एप्रिलपासून पुणे, नाशिक, अमरावती येथे पडताळणीला सुरुवात होणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. दर वर्षी शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या नावाने ५ विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये गवळण, ढोलकीवादक, गायक (तमाशातील सरदार), वेशभूषाकार, सोंगाड्या आदिंचा समावेश असेल. त्याचप्रमाणे विठाबाई नारायणगावकर यांना पुण्यतिथीदिनी शासनातर्फे आदरांजली अर्पण केली जावी, या मागणीलाही मान्यता मिळाल्याचे जाधव यांनी सांगितले.
लोककलावंतांच्या मुलांसाठी उभारणार गुरुकुल
By admin | Published: January 31, 2016 1:39 AM