मुंबई : दाऊदला कराचीमध्ये गुटख्याचा कारखाना उभारण्यास मदत केल्याचा आरोप असलेले गुटखा उत्पादक रसिकलाल धारीवाल आणि जे.एम. जोशी यांना विशेष मोक्का न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कबुलीजबाबात या दोघांची नावे घेतली होती.सीबीआयने काही दिवसांपूर्वीच धारीवाल व जोशी यांच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष मोक्का न्यायालयाने या दोघांची १६ सप्टेंबरपर्यंत अंतरिम जामिनावर सुटका केली आहे.यापूर्वी दाखल केलेले दोषारोपपत्र अनिसचा मदतगार जमीरुद्दीन अन्सारीविरुद्ध दाखल करण्यात आले. त्यानेही पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, तो २०००मध्ये दुबईत गेला असताना त्याने जोशीला अनिसबरोबर पाहिले होते.धारीवालकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी जोशी अनिसची मदत घेत असे. अनिसच्या बोलवण्यावरूनच धारीवाल दुबईत गेला होता, असे अनिसनेच कबुलीजबाबात म्हटले असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.त्यानंतर ते कराचीला गेले. धारीवाल आणि जोशी यांच्या वादामध्ये दाऊद इब्राहिमने मध्यस्थाची भूमिका घेऊन त्यांच्यामधील वाद मिटवले. त्यानंतर या दोघांनी दाऊदला अंनिसकरिता कराचीमध्ये गुटख्याची फॅक्टरी उभारण्यास मदत केली, असे अन्सारीने पोलिसांना चौकशीत सांगितले. (प्रतिनिधी)
गुटखा उत्पादकांची अंतरिम जामिनावर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2016 3:16 AM