पुणे : इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे येत्या सोमवारपासून (दि.२६) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे.पहिल्या सत्राच्या शेवटच्या आठवड्यात शैक्षणिक कार्यक्रम सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नव्हते. परिणामी शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे सोमवारपासून दररोज सकाळी ७.३० सात ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ज्ञानगंगा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे गिरवता येणार आहेत.
शिक्षक १५ जूनपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या ठिकाणी शिक्षक प्रत्यक्ष गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा येत असल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एमकेसीएल आणि राज्य परिषदेच्या सहकार्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. परंतु, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही शैक्षणिक कार्यक्रम नव्हता. परिणामी आपल्यासाठी अभ्यासक्रम कधी सुरु होणार याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लागले होते. त्यामुळे आता शैक्षणिक कार्यक्रमाची प्रतीक्षा संपणार आहे. ज्ञानगंगा कार्यक्रम सुरू करण्याबाबतची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.