अजित मांडके/पंकज पाटीलठाणे : सकाळी नऊ वाजेपर्यंत बिछान्यात मस्त लोळा... नंतर हॉटेलमधील जिममध्ये किंवा परिसरातील हिरवळीवर ‘मॉर्निंग’ वॉक करा... मग भरपेट नाश्ता... टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या पाहायच्या... दुपारी जेवणाच्या वेळी मिटिंग... एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन... मग वामकुक्षी... सायंकाळी पुन्हा चर्चा-बैठका... रात्री गाण्याच्या भेंड्या अन् नाच... हा आहे गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलात गेले आठवडाभर मुक्काम ठोकलेल्या शिंदे समर्थक आमदारांचा दिनक्रम... राजकारणाच्या धकाधकीतून लाभलेला निवांतपणा एकीकडे सुखकर वाटत असताना दुसरीकडे राजकीय भवितव्याची चिंता आहेच.मतदारसंघात असताना बहुतेक आमदार सकाळपासून रात्रीपर्यंत व्यस्त असतात; मात्र गुवाहाटीच्या मुक्कामाने थकवा आणणाऱ्या दिनक्रमातून निदान आठवडाभर सुटका केली आहे. स्पा, मसाज वगैरे कोडकौतुकांना वेळ मिळाला आहे. सर्व सुखे असली तरी ती चार भिंतीत आहेत. हॉटेलबाहेर पडण्यास आमदारांना मज्जाव केला आहे.राज्यातील सर्वात मोठे बंड म्हणून शिंदे यांच्या बंडाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे त्याची दखल विविध देशातील मीडियाने घेतली आहे. त्यामुळे गुवाहाटीमध्ये देशातीलच नव्हे तर विदेशी वाहिन्यांचे कॅमेरे हॉटेलबाहेर लागलेले आहेत. यामध्ये पाकिस्तानमधील वाहिन्यांचा देखील समावेश असल्याचे वास्तव्यास असलेले आमदार सांगतात; परंतु चॅनलचे कॅमेरे हॉटेलपासून तब्बल एक किमी दूर असून त्यांना आत प्रवेश दिला जात नाही; परंतु एखादी गाडी हॉटेलमध्ये आली किंवा हॉटेलबाहेर जाताना दिसली तर त्या भोवती वाहिन्यांचे प्रतिनिधी गराडा टाकतात.
- आतापर्यंत कामात व्यस्त असलेल्या अनेक आमदारांना आपल्या पोटाने ‘बंडखोरी’ केल्याची जाणीव झाली नव्हती. सकाळी उशिरा उठल्यावर स्वत:कडे निरखून पाहिल्यावर काहींना या बंडाचा साक्षात्कार झाल्याने त्यांनी आता नऊ वाजता बिछाना सोडल्यावर हॉटेलमधील हिरवळीवर ‘मॉर्निंग’ वॉक सुरू केला आहे. - काहींनी चक्क जिममध्ये पाऊल ठेवून तेथे ट्रेडमिलवर चालण्याचा सराव सुरू केला आहे. काही आमदार स्वीमिंगची हौस भागवत आहेत. त्यानंतर आंघोळ आणि नाश्ता झाल्यावर बहुतेक आमदार टीव्हीसमोर बसतात आणि बातम्या पाहतात. - दुपारच्या जेवणाच्या वेळेस शिंदे सर्वांची मिटिंग घेतात. घडामोडींची माहिती देतात. पुढे उचलत असलेल्या पावलांची कल्पना देतात. शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याची व्यूहरचना ठरते. मतदारसंघातील पदाधिकारी, नगरसेवक यांना फोन करून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले जातात.
- खुद्द शिंदे यांच्या आमदार व कायदेतज्ज्ञ यांच्यासोबत बैठका सुरू असतात. यासाठी एक वेगळी मोठी टीम कार्यरत आहे. सायंकाळी ‘चाय पे चर्चा’ सुरू होते. सायंकाळी गप्पांचे फड जमतात, टिंगल टवाळी सुरू होते. - जशास तसे उत्तर देण्यासाठी काय केले पाहिजे यावर ऊहापोह केला जातो. रात्री रोजच्या रोज ऑर्केस्ट्रा असतो. गाण्याची हौस असलेले आपली हौस भागवून घेतात.- काहीजण डान्स करतात. मैफिलीत रंग भरले जातात. घरची आठवण आल्यावर व्हिडिओ कॉल केले जातात. ही ‘सहल’ कधी संपेल ते त्यांनाही ठावूक नाही.
डॉक्टरांची विशेष टीम -आमदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तीन ते चार डॉक्टरांची टीम तैनात केली आहे. त्यांच्याकडून रोजच्या रोज काही आमदारांचे बीपी, शुगर चेक केली जाते. तब्येतीची काळजी घेतली जाते. कोणाला काही औषधे हवी असतील तर उपलब्ध करून दिली जातात.