Uday Samant, Maharashtra Budget Session: अनधिकृत बांधकामांची तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, तसेच ज्या पद्धतीने वरळीमध्ये सॅटॅलाइट मॅपिंग करण्यात आले त्याच पद्धतीने पायलट प्रोजेक्ट म्हणून एच पश्चिम विभागातील अनधिकृत बांधकामांचे सॅटेलाईट मॅपिंग करण्यात येईल, अशी घोषणा नगर विकास खात्यातर्फे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज केली.
बृहन्मुंबई महापालिका हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ होत असल्यास बाबतची लक्षवेधी आज विधानसभेत उपस्थित करण्यात आली होती. या विषयावर बोलताना भाजप आमदार अँड आशिष शेलार यांनी ज्या पद्धतीने वरळीमध्ये सॅटॅलाइट मॅपिंग करण्यात आले त्या पद्धतीने मुंबईत अन्य भागात ही हे मॅपिंग करणार का? विशेषत: एच पश्चिम म्हणजेच वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रुज पश्चिम या विभागातील अनधिकृत बांधकामांचे सॅटॅलाइट मॅपिंग करणार का ?असा प्रश्न उपस्थित केला तसेच अनधिकृत बांधकामांची तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचे नाव संरक्षित केले जात नाही त्यामुळे तक्रारदार सुरक्षित नाही त्यामुळे त्यांचे नाव गुप्त ठेवणार का? तसेच मुंबईतील जमीन विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात त्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यास त्या संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्याची यंत्रणा उभी करणार का? असे प्रश्न आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना तिन्ही मागण्या मंत्री उदय सामंत यांनी मान्य केल्या.
वांद्रे रेक्लमेशन डिपी बाबत बैठक
वांद्रे पश्चिम रेक्लमेश परिसराचा ईपी झाला परंतु डीपी फायनल झालेला नाही, ही बाब आज लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार अँड आशिष शेलार यांनी निदर्शनास आणून देऊन या भागातील विविध आरक्षणे प्रस्तावित असली तरी डीपी अंतिम न झाल्यामुळे काम रखडले आहेत ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर याबाबत लवकरच बैठक घेऊन डीपी बाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.