गौरी टेंबकर - कलगुटकर -मुंबई : 'मला ५० हजार रुपयांची गरज आहे. फोन पे किंवा गुगल पेवरून पाठवशील का?' असा मेसेज मालाडच्या चेतन महोवियांना व्यावसायिक विजय सिंह यांच्या 'फेसबुक' मेसेंजरवरून मिळाला. विजय यांच्या तरुण मुलाचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे. त्यामुळे महोविया यांनी याबाबत त्यांच्या भावाशी बोलणे केले आणि त्यांनी पैसे मागितलेच नसून सदर मेसेज हा 'बोगस' अकाऊंटवरून आल्याचे उघड झाले. त्यावरून हॅकर आता एखाद्याच्या दुःखाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचे पुढे आले आहे.
विजय सिंह यांचा मुलगा राजन सिंह (३७) याचे गेल्या महिन्यात २५ जून, २०२१ रोजी कोरोनाने निधन झाले. त्याच्या पश्चात वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अशा अचानक जाण्याने विजय याना जबर मानसिक धक्का बसला आहे. राजनच्या निधनाची पोस्ट त्यांचे लहान बंधू अजय सिंह यांनी फेसबुकवर टाकली होती. हे कुटुंबीय राजनच्या अंत्यविधीसाठी गावी गेले आहे. त्याचा फायदा हॅकरने उचलत विजय यांच्या नावाने बोगस अकाऊंट तयार केले आणि अनेकांना मेसेंजरवर मेसेज टाकत पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यापैकीच महोविया हे एक होते.
... म्हणून मी पैसे दिले नाहीतमला विजय सिंह यांचा फोटो आणि ९६९४६४३३४२ या अनोळखी क्रमांकावरून मेसेज करत ५० हजार रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. मात्र, मला थोडा संशय आल्याने मी अजय सिंह याना फोन केला. तेव्हा अशी काही मागणीच करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे महोविया यांनी सांगितले.
फेक पोस्ट पडताळणीसाठी आता 'समाधान ऍप' फेसबुक खाते हॅक करत त्याद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले असून आमचे त्यावर लक्ष आहे. आतापर्यंत अनेक प्रकरणांचा छडा आम्ही लावला आहे. खाते हॅक झालेच तर त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. जेणेकरून त्यांना पोलिसांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. तसेच 'समाधान ऍप' मार्फतही अशा बोगस खात्यांची विश्वासार्हता पडताळता येईल.- सरला वसावे, पोलीस निरीक्षक, समतानगर सायबर सेल प्रमुख.