महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या माहिममध्ये निवडणुकीत मोठा खेळ झालेला दिसत आहे. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने मतदानानंतर आज ठाकरे गटात प्रवेश केल्याने निवडणुकीत सदा सरवणकर आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना जाणारी रसद ठाकरेंच्या कामी आल्याची चर्चा सुरु झाली आहे.
माहिममध्ये राज ठाकरेंचा मुलगा उभा असल्याने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी मनसेला मदत करण्याची भूमिका घेतली होती. तर महायुतीत शिंदेंनी सदा सरवणकरांना उमेदवारी देत माघारही घेतली नव्हती. यामुळे येथील निवडणूक सरवणकर वि. अमित ठाकरे अशीच रंगविली गेली होती. भाजपाच्या नेत्यांना अमित ठाकरेंना मदत करण्याचे आदेश होते. परंतू, या मतदारसंघातील नेते असलेले भाजपाचे सचिव सचिन शिंदे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने पडद्यामागे नेमके काय घडले असेल याचे चित्र आता रंगू लागले आहे.
मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदेंच्या हाती मशाल आली असून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावर ठआकरेंनी शिंदे यांचे शिवसेनेत स्वागत करत असल्याचे म्हटले आहे. सचिन शिंदे त्यांच्या जीवाभावांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करत आहेत. त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. भाजपाकडून त्यांच्यावर अन्याय झाला नाही पण न्यायही मिळाला नाही. परंतू, मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही. मी तुम्हाला जनतेपर्यंत पोहचण्याची संधी देईन, असा शब्द ठाकरे यांनी दिला.
सर्वांना उद्याच्या निकालाची उत्सुकता आहे. कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता. 19 तारखेला वसई- विरारला नोटांचा बॉम्ब फुटला तो मोठा आहे. कालचा जो काही बॉम्ब फुटला त्याने संपूर्ण देश हादरला. या घोटाळे बाजांचे काय करणार हा प्रश्न केंद्रसरकारला विचारला पाहिजे, अशी टीका ठाकरे यांनी अदानी लाचखोरी प्रकरणार केली.