मुंबई : पाम्पोर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईदचा जावई खालीद वलीद असल्याचा संशय आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर झालेल्या या हल्ल्यात आठ जवान शहीद, तर २२ जखमी झाले होते. २५ जूनच्या या हल्ल्याचे कारस्थान वलीद याने रचले होते, तर हंझला अदनान व साजीद जाट या त्याच्या सहकाऱ्यांनी या हल्ल्याचे नियोजन आणि संचालन केले होते. लष्कर-ए-तोयबाचा दक्षिण काश्मीरमधील कमांडर अबू दुजाना याने दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या हालचालीची माहिती पुरविण्यासह इतर स्वरूपाची मदत केली होती, असे एका वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे हंझला व साजीद हे बीएसएफच्या ताफ्यावरील हल्ल्यादरम्यान जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी मोहंमद नावीद याचेही ‘हॅण्डलर’ होते. हाफीज सईदने लष्कर-ए-तोयबाच्या भारतविरोधी मोहिमेची जबाबदारी त्याचा जावई वलीदवर सोपविल्याचे या वृत्तात म्हटले आहे. वलीद दीर्घकाळापासून जमात-उद-दावाशी संबंधित आहे. २५ जून रोजी ८ सीआरपीएफ जवानांची हत्या करणाऱ्या दोन आत्मघाती हल्लेखोरांना लष्कर-ए-तोयबाच्या पाकव्याप्त काश्मिरातील प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले होते. अबू कायतल लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण शिबिराचे काम पाहतो. सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीने या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पाम्पोर येथील हल्ल्यात थेट पाकिस्तानचाच हात असल्याचे गुप्तचर संस्थांचे मत आहे. पोलिसांनीही हल्ल्याची पद्धत पाहता तसेच म्हटले आहे. (वृत्तसंस्था)पाकिस्तान आॅर्डिनन्स फॅक्टरीचे चिन्ह असलेले सात ग्रेनेड दहशतवाद्यांकडे आढळून आले. त्यांच्याकडे आढळलेली औषधे, ट्रॅक सूट आणि बूट सर्वकाही पाकिस्तानी बनावटीचे होते. त्यावरून पाम्पोर हल्ल्यात थेट पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध होते, असे गुप्तचर संस्थांचे मत आहे.
हाफीजचा जावई पाम्पोर हल्ल्याचा सूत्रधार
By admin | Published: June 29, 2016 6:04 AM