मुंबई : राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा धुमाकूळ सुरूच असून, १६ मार्च (सोमवारी) रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. शिवाय कोकण-गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्याचे कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तर विदर्भाच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्याचे किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.पुढील २४ तासांसाठी मुंबईचे हवामान ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, २० अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
राज्यात गारांचा इशारा कायम!
By admin | Published: March 16, 2015 2:57 AM