ऑनलाइन लोकमत
Locals hold "Hawan" in Mumbai, ahead International Court of Justice"s verdict on #KulbhushanJadhav today pic.twitter.com/aimuMc3mbf— ANI (@ANI_news) May 18, 2017
कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी मुंबईतील ना. म.जोशी मार्गावर त्यांच्या मित्र परिवाराकडून आरतीचे आयोजन
आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी फी म्हणून फक्त 1 रुपये आकारल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. हरीश साळवे यांच्या नियुक्तीवरुन केंद्र सरकारवर टीका झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली. भारताला हरीश साळवे यांच्या इतकाच सक्षम दुसरा वकील स्वस्तात मिळू शकला असता अशी टीका एका टि्वटर युझरने केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी साळवे यांच्या ""फी""चा आकडा जाहीर केला.
कोण आहेत हरीश साळवे?
हरीश साळवे हे दिवंगत काँग्रेस नेते एनकेपी साळवे यांचे सुपूत्र. भारतातील महागड्या वकिलांमध्ये त्यांचा समावेश होतो. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार सर्वोच्च न्यायालयात एका दिवसाच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी ते 30 लाख रुपये आकारतात. भारताचे माजी सॉलिसीटर जनरल राहिलेले हरीश साळवे आता लंडनमध्ये स्थायिक आहेत. चार्टर्ड अकाऊंटट म्हणून कारर्कीद सुरू केल्यानंतर ते वकिली पेशाकडे वळले. सुरुवातीला त्यांनी नाना पालखीवाला आणि सोली सोराबजी या भारताच्या दोन कायदेतज्ज्ञांकडे प्रॅक्टीस केली. 1992 साली साळवे सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकील पदावर कार्यरत झाले. त्यानंतर 1999 साली ते भारताचे सॉलिसिटर जनरल झाले. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे नागपूरचे सुपुत्र आहेत.
देशाची अस्मिता पणास लागलेल्या या प्रकरणात साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ९ मे रोजी कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती मिळवून पहिली लढाई जिंकली होती. हरीश साळवे हे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत एनकेपी साळवे यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे आजोबा पी. के. साळवे गाजलेले फौजदारी वकील तर, पणजोबा न्यायाधीश होते. ते अनेक वर्षांपासून दिल्लीत असले तरी त्यांची नागपूरशी नाळ तुटलेली नाही. त्यांच्या भगिनी अरुणा व जावई अरुण उपाध्याय हे नागपुरातील प्रतिष्ठित मान्यवर आहेत. अरुणा उपाध्याय सध्या लंडनमध्ये आहेत.
‘लोकमत’ने यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा क्षण केवळ आमच्या कुटुंबीयांसाठीच नाही तर, संपूर्ण नागपूरसाठी अभिमानाचा आहे. हरीश यांच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते कुलभूषण यांना निर्दोष मुक्त करण्यात यशस्वी होतील. त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला त्यावर गांभीर्याने विचार करावा लागेल, असे अरुणा उपाध्याय यांनी सांगितले.
‘आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणे विचारपूर्वक होते’
कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस-आयसीजे) मागितलेली दाद हा ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय’ होता. कारण भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आहे व त्यांच्या जीविताला धोकाही आहे, असे परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधवप्रकरणी दाद का मागितली, असे वार्ताहरांनी विचारले असता मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले की, ‘भारताने जाधव यांची भेट घेण्यासाठी 16 वेळा केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली. भेट नाकारणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होते. जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती 27 एप्रिल रोजी पाकला करण्यात आली होती. त्यानुसार व्हिसा मान्य करण्यात आला आहे.’
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.