नाशिक : देशाच्या सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या लष्करातील १५० जवानांनी बुधवारी क्षुल्लक कारणावरून उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना बेदम मारहाण करीत कार्यालयाची तोडफोड केली़ पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. देवळाली कॅम्पमधील स्कूल आॅफ आर्टिलरीचे शिकाऊ लष्करी अधिकारी आशिष बागुल त्याच्या मामासोबत तक्रार देण्यासाठी मंगळवारी रात्री उपनगर पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी अंमलदार कक्षासमोरील रस्त्यावर उभी केलेली बुलेट पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महाजन बाजूला करीत असताना आशिष व त्याचे मामा जयंत नारद यांनी महाजन यांच्याशी वाद घातला. त्यांच्यात हाणामारीही झाली. त्यामुळे पोलिसांनी बागुल व नारद यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बुधवारी पहाटे बागुल यास लष्कराच्या ताब्यात दिले. मात्र दुपारी सव्वादोनच्या सुमारास सुमारे शंभर ते दीडशे जवानांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला़ कार्यालयातील सर्व टेबल, खुर्च्या, संगणक फोडले. या दंगेखोर जवानांनी दिसेल त्या पोलिसास मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यांच्या हल्ल्यातून महिला पोलीसही सुटल्या नाहीत़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांनाही मारहाण झाल्याचे समजते़ हल्ल्यात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी बबन झुंबर सलगार, रतन धरमचंद नागलोक यांच्यासह आणखी एका पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आवारातील दुचाकी, पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करून हे जवान फरार झाले़
नाशकात जवानांचा धुडगूस
By admin | Published: January 15, 2015 5:42 AM