जमीर काझीमुंबई : या वर्षी हज यात्रेसाठी जाण्यास इच्छुक असूनही हज कमिटी ऑफ इंडियाने काढलेल्या सोडतीत नंबर न लागलेल्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. हज समितीचा कोटा तब्बल १४ हजार ९७५ जागांनी वाढविण्यात आला आहे. यातील सर्वाधिक २,३८७ जागा महाराष्ट्राच्या वाट्याला आल्या आहेत. सौदी अरेबिया सरकारशी झालेल्या करारानुसार सौदी दूतावासाकडून ही वाढ करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीवर प्राधान्यक्रमानुसार अर्जदारांची निवड केली असून संबंधितांनी ९ मेपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करायची आहेत. वाढलेल्या जागांमुळे या वर्षी हज कमिटीकडून एकूण १ लाख ४० हजार यात्रेकरूंना हजला जाता येईल.
इस्लाम धर्मातील प्रमुख पाच तत्त्वांपैकी हज यात्रा एक असून ती दरवर्र्षी सौदी अरेबियात होते. जगभरातील मुस्लीम बांधव यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. भारतातील यात्रेकरूंसाठी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडून नियोजन होते. भारतासाठी सरासरी १ लाख ६० हजार यात्रेकरूंना पाठविले जाते. यात जवळपास ५० हजार जागा खासगी टुर्स कंपनीला दिल्या असून उर्वरित यात्रेकरूंच्या यात्रेचे नियोजन हज कमिटी ऑफ इंडियाकडून होते. या वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी हज कमिटीसाठी सुरुवातीला १ लाख २५ हजार जागा देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या अर्जांतून संगणकीय सोडत काढून निश्चित करण्यात आल्या. याशिवाय हज कमिटीने आणखी कोटा वाढवून देण्याची मागणी जानेवारीत मंत्रालयामार्फत केली होती. त्यानंतर आता सौदी अरेबियाच्या जेदाद्द दूतावासाने १८ एप्रिलला १४ हजार ९७५ जागांचा अतिरिक्त कोटा बहाल केला आहे.
अतिरिक्त कोट्याचे विविध १४ राज्यांतील इच्छुकांच्या प्रमाणानुसार वाटप करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील रहिवाशांना सर्वाधिक २,३८७ जागा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रतीक्षा यादीवर असलेल्या ७२१ ते ३,१०४ क्रमांकावर असलेल्यांना हजला जाण्याची संधी मिळणार आहे.
अतिरिक्त कोट्यातील राज्यनिहाय जागाअतिरिक्त कोट्यातील महाराष्ट्र (२,३८७)व्यतिरिक्त अन्य प्रमुख राज्यांना देण्यात आलेल्या जागा अशा- उत्तर प्रदेश (२,१५४), केरळ (१,६३२), जम्मू-काश्मीर (१,५७६), कर्नाटक (१,४५२), राजस्थान (१,१४३), गुजरात (१,०७५), मध्य प्रदेश (८७८), तेलंगणा (८२१)
प्रतीक्षा यादीवरील इच्छुकांना संधीसौदी दूतावासाशी झालेल्या पत्रव्यवहारानुसार हज कमिटीला १४,९७५ अतिरिक्त कोटा मिळाला आहे. या जागांवर राज्यनिहाय प्रतीक्षा यादीवरील इच्छुकांना संधी देण्यात आलेली असून पात्र ठरलेल्यांनी वेळेत कागदपत्रे व रकमेची पूर्तता केल्यानंतर त्यांचा प्रवास निश्चित समजला जाईल. - डॉ. एम. ए. खान, मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया