नागपूर : जगप्रसिद्ध खाद्यपेये व स्नॅक्स ब्रँड हल्दीरामने २०१८-१९ मध्ये एक अब्ज डॉलरची (७,१३० कोटी रुपये) विक्री करून एक नवा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांत हल्दीरामची विक्री दुप्पट झाली आहे.
व्हेराटेक इंटेलिजन्स या संस्थेने गोळा केलेल्या सर्वेक्षणानुसार, हल्दीरामने विक्रीच्या बाबतीत मोंडलेझ इंडियाला मागे टाकले असून, आता हल्दीरामची स्पर्धा हिंदुस्तान युनिलिव्हर खाद्यपेये व स्नॅक्स विभागाशी आहे.
हल्दीरामची विक्री २०१७-१८ मध्ये ६,२४१ कोटी होती, त्यात १४ टक्क्यांची वाढ होऊन ती ७,१३० कोटीवर पोहोचली आहे. हल्दीरामच्या विक्रीमध्ये ८० टक्के वाटा पॅक केलेल्या स्नॅक्सचा आहे. याशिवाय हल्दीराम अनेक रेस्टॉरंट शृंखलासुद्धा संचालित करतात. नव्या विक्रमाबाबत बोलताना हल्दीरामचे प्रवक्ते म्हणाले, आम्हाला ग्राहकांना कुठल्या प्रकारचे व कुठल्या चवीचे स्नॅक्स आवडतात, त्याची योग्य जाण आहे. त्यामुळे स्नॅक्सचे उत्पादन व पॅकिंग हे आम्ही स्वत:च करतो. शिवाय आमचे कर्मचारी अत्यंत निष्ठावान आहेत, त्यांचाही या यशात वाटा आहे.
हल्दीरामची सुरुवात गंगाबिसन अग्रवाल ‘भूजीयावाला’ यांनी बिकानेरमध्ये १९३७ ला एक खाद्यपदार्थ व स्नॅक्सचे दुकान सुरू करून झाली. त्यांच्या चिरंजीवांनी नंतर दिल्ली, कोलकाता व नागपूर या शहरातील व्यवसाय वाढविला. १९९० च्या सुमारास व्यवसाय विभागणी झाल्यानंतर आता अग्रवाल कुटुंबीयांच्या तीन शाखा दिल्ली, कोलकाता व नागपूर येथील व्यवसाय स्वतंत्रपणे बघतात. हल्दीरामशिवाय अग्रवाल कुटुंबाचे बिकानेरवाला, भिकाराम चांदमल, बिकानो व बिकाजी हे खाद्यपदार्थ व स्नॅक्स ब्रँड आहेत. भारतातील खाद्यपदार्थ, स्नॅक्सची बाजारपेठ ३२,००० कोटीची आहे, त्यापैकी २० टक्के वाटा हल्दीरामचा आहे.