ऑनलाइन लोकमतकुरूंदा, दि. 24 - परिसरात झालेल्या पावसामुळे कुरूंदा येथील जलेश्वर नदीला पूर आला होता. गावात पाऊस न होता रविवारी जलेश्वर नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पुराचे पाणी नदीलगत असलेल्या शेतात शिरल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. कुरूंदा परिसरात डोणवाडा या भागात रविवारी तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. चार वाजण्याच्या सुमारास कुरूंद्याच्या नदीला अचानक पूर आला. हा पूर ओढा ओलांडून रस्त्यावरून पाणी पाहत होते. अचानक आलेल्या नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांची नदीच्या पुलावर गर्दी जमली होती. नदीकाठच्या शेतीला याचा पुन्हा फटका बसलेला दिसला. यापूर्वी २९ जून रोजी मोठ्या प्रमाणात नदीकाठची शेती खरडून गेली होती. त्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सतत पावसामुळे शेतीचा ओलावा कायम होता. पुन्हा पाणी आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात पेरण्या रखडलेल्या आहेत. नदीला सतत येणाऱ्या पुरामुळे गावाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलेश्वर नदीच्या पुलाजवळील पात्राचे खोलीकरण व रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
हिंगोलीतल्या कुरूंद्याच्या जलेश्वर नदीला पूर
By admin | Published: July 24, 2016 8:54 PM