दौंड : दौंड रेल्वे स्थानकात पुणे-हाटिया एक्सप्रेसमध्ये दीड वर्षाच्या बालकाला त्याचे आई-वडील सोडून गेले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या बालकाला एकप्रकारे नवीन जन्मच मिळाला.कोणाचेही हृदय गहिवरुन येईल, अशी या बालकाची रेल्वेच्या डब्यात स्थिती झाली होती. पुणे-हाटिया एक्सप्रेस गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आली तेव्हा एस ११ या बोगीतील स्वच्छतागृहाजवळ सदरचे बालक रडत होते. त्याला कोणीही वाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना ही घटना कळविण्यात आली. त्यानुसार पोलीस या डब्याजवळ आले. त्यांनी या बालकाला उचलून घेतले. गाडी जाईपर्यंत त्याच्या आई-वडिलांचा शोध घेतला, मात्र कोणीच या मुलाला वाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर हाटिया एक्सप्रेस गेल्यावर या मुलाला पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर त्याला दूध, बिस्किट दिल्यावर मुलाचे रडणे थांबले. या मुलाला रेल्वे महिला पोलीस वनिता गोयेकर यांनी आपुलकीच्या नात्याने कपडे घेतले. एकंदरीतच पोलिसांनी केलेल्या तपासानुसार या बालकाचे आई-वडील त्याचे पालनपोषण करण्यास असमर्थ असल्यामुळे या बालकाला रेल्वेच्या डब्यात सोडून गेले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती रेल्वे पोलीस दीपक बाळेकुद्री यांनी दिली. (वार्ताहर)... पोलिसांना अश्रू अनावर झाले ४सायंकाळच्या सुमारास दौंड रेल्वे पोलिसांनी या बालकाला त्यांच्या गाडीतून केडगाव (ता. दौंड) येथील बालक आश्रमात सोडले. त्या वेळी पोलिसांनादेखील अश्रू अनावर झाले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीनुसार या बालकाच्या मदतीला पोलीस धावून आल्याने त्याला एकप्रकारे नवजन्मच मिळाला, असेच म्हणावे लागेल.
रेल्वे डब्यात दीड वर्षाचे बालक
By admin | Published: February 23, 2017 2:12 AM