संतोष मिठारी, कोल्हापूर विविध अत्याचारांच्या प्रकारांमुळे मुली मानसिकदृष्ट्या खचत आहेत. त्यांना आत्मसंरक्षणासह कायदेविषयक तरतुदी, आदी स्वरूपातील माहिती देऊन सक्षम करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने ‘निर्भय कन्या अभियान’ हाती घेतले आहे. याअंतर्गत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे दीड लाख विद्यार्थिनींना ज्यूदो, कराटेच्या माध्यमातून आत्मसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एनएसएस) हे अभियान राबविले जाणार आहे. याअंतर्गत विद्यापीठ परिसरातील विभागांमधील एक हजार ९०० आणि कोल्हापूर, सांगली व सातारा या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थिनींना निर्भय बनविले जाणार आहे. त्यांना कराटे-कुंग फू, लाठी-काठी, योगा, प्राणायाम यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच महिलांबाबत संविधानामधील कायदेविषयक तरतुदी, लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती देण्यात येणार आहे. वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.निर्भय कन्या अभियानाची संकल्पना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मांडली. त्यानुसार एनएसएस व विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माध्यमातून हे अभियान राबविले जात आहे. जून-जुलैपासून अभियानाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीआपले गाव, शहरातील अन्य मुली, विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणार असल्याचे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.
दीड लाख विद्यार्थिनी होणार ‘निर्भय’
By admin | Published: March 08, 2016 2:42 AM