औरंगाबाद : ग्रामीण अर्थचक्राचा कणा असणाऱ्या आठवडे बाजारावर दुष्काळाचा विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यात ९ तालुक्यांत ९२ आठवडे बाजार असून, त्यांची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींच्या घरात आहे. दुष्काळामुळे ही उलाढाल निम्म्यावर आली आहे. बुधवारी औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी, चित्तेपिंपळगाव, आडगाव सरक, गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव, कन्नड तालुक्यातील चापानेर, नागापूर, पैठणमधील बिडकीन, सिल्लोड तालुक्यातील शिवना, आमठाणा, फुलंब्रीतील बाबरा, वैजापूरमधील लोणी खु., परसोडा, खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद येथे आठवडे बाजार भरतात. या सर्व बाजारात सध्या सन्नाटा आहे. पाण्याअभावी पालेभाज्यांचा तुटवडा आहे. परजिल्ह्यांतून येणाऱ्या पालेभाज्या व फळभाज्यांवर सर्व मदार आहे. लाडसावंगी येथील आठवडे बाजारातील मसाले विक्रेते शेख जमीर यांनी सांगितले की, दोन महिन्यांपासून उलाढाल घटली असून शेतकऱ्यांच्या हाती पैसाच नाही. ग्रामविकास अधिकारी बी. एस. मुखाडे यांनी सांगितले की, स्थानिक आवक घटल्याने त्याचा परिणाम बाजारात जाणवत आहे. कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव के. एम. वानखेडे म्हणाले की, आठवडे बाजारात शेतीमालाची आवक कमी झाली आहे. परिणामी ५० टक्के उलाढालीवर परिणाम झाला आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रप्रकाश खरात यांनीही याला दुजोरा दिली आहे. पैठण तालुक्यात १३ आठवडे बाजार भरतात. काही बाजारातील उलाढाल ८ ते १० लाखांवरून २ ते ३ लाखांवर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ९२ आठवडे बाजार भरतात. महिनाभरात सुमारे २५० ते ३०० कोटींची उलाढाल होत असते. ही उलाढाल ६० टक्क्यांनी घटल्याचे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व्ही. ए. शिरसाठ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)> पाण्याच्या टंचाईमुळे आठवडे बाजारात शेतीमालाची आवक ५५ टक्क्यांपर्यंत घटली आहे. तसेच पाण्याअभावी दावणीची जनावरे विक्रीला आणण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, खरेदीदारांनीच पाठ फिरविल्याने जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत, असे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आर.एस. काकडे यांनी सांगितले. वैजापूर तालुक्यात १२ आठवडे बाजार भरतात. त्यातील महालगाव, लोणी खु. व मनूर येथे जनावरांचा बाजारही भरतो. मागील दोन महिन्यांत जनावरांना विक्रीला आणण्याचे प्रमाण वाढल्याचे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व्ही.डी. शिनगर यांनी सांगितले.
आठवडे बाजारांतील उलाढाल निम्म्यावर
By admin | Published: May 11, 2016 4:05 AM