लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव जागांवर राज्यभरातील शाळांमध्ये अद्याप ५० टक्केही प्रवेश झालेले नाहीत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये चार ते पाच फेऱ्या पूर्ण होऊनही तब्बल ६२ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. ग्रामीण भागात मिळालेला अत्यल्प प्रतिसाद आणि पालकांकडून ठराविक शाळांना असलेल्या मागणीमुळे प्रवेश कमी झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात सर्वाधिक सुमारे १० हजार प्रवेश एकट्या पुणे जिल्ह्यात झाले आहेत.राज्यात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी एकूण ८ हजार २७८ शाळांमध्ये १ लाख २० हजार ५४३ जागा उपलब्ध आहेत. यंदा या जागांवर प्रवेशासाठी राज्यात पहिल्यांदाच सर्व जिल्ह्यांत आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशासाठी १ लाख ४४ हजार ८५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमधून संगणकाद्वारेच लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत पाच लॉटरी फेऱ्या झाल्या आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही आतापर्यंत चार किंवा पाच फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ ५८ हजार ८ प्रवेश झाल्याचे शिक्षण विभागाच्या आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.राज्यात अद्याप ५० टक्केही प्रवेश पूर्ण झाले नसून तब्बल ६२ हजार ५३५ जागा रविवारअखेरपर्यंत रिक्त राहिल्या आहेत. एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे ५८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल,े तरी अनेक विद्यार्थ्यांची काही शाळांमध्ये निवड होऊनही त्यांनी प्रवेश घेतला नाही. काही विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रवेश मिळालेला नाही. तर अनेक पालकांनी अर्ज करताना ठराविक शाळेलाच पसंती दिल्याचे दिसते. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश पूर्ण झाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच ग्रामीण भागात अद्यापही आरटीई प्रवेशाबाबत तेवढी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे प्रवेश क्षमतेपेक्षा जादा अर्ज येऊनही रिक्त जागांची संख्या अधिक आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.यंदा अधिक प्रवेश मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आरटीईच्या प्रवेशामध्ये वाढ झाली आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यात सर्वत्र आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात असल्याने सोपी झाली आहे. शहरी भागांतील पालकांना याबाबत पुरेशी माहिती झाली झाली आहे. मागील वर्षी यंदाच्या तुलनेत ४० ते ४५ टक्केच प्रवेश झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्राथमिकचे प्रभारी शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी आरटाईची प्रक्रिया अद्याप सुरू असून शंभर टक्के प्रवेश होतील, असा दावा केला आहे.पुणे जिल्हा आघाडीवरराज्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार ९७१ प्रवेश झाले आहेत. जिल्ह्यात सुमारे १५ हजार ७०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी तब्बल ३६ हजार ९३३ अर्ज आले असून त्यातही पुणे आघाडीवर आहे. तर, राज्यात सर्वाधिक १६ हजार ४५६ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात केवळ ४ हजार ३६२ प्रवेश झाले आहेत. पुण्यापाठोपाठ नागपूर, ठाणे, नाशिक आणि मुंबई यांचा क्रमांक लागतो.
आरटीईच्या अर्ध्या जागा रिक्त
By admin | Published: May 23, 2017 5:38 AM