खळद : गावाच्या उत्तर बाजूने कऱ्हा नदी वाहते. या नदीला ज्या-ज्या वेळी पूर येतो, अशा वेळी नदीचे पात्र हळूहळू गावाच्या बाजूला विस्तारत असल्याचे पाहावयास मिळत आहे. आज रोजी कधीही एखादा मोठा पूर आला, तर गावाला मोठा धोका पोहचून निम्मे गाव वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या भागात गावालगत तातडीने संरक्षक भिंत होण्याची गरज आहे.गावातील हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आदी महत्त्वाच्या इमारतीही या नदीलगत आहेत. या नदीपासून या इमारतीमध्ये जवळपास शंभर ते दोनशे मीटरपर्यंत अंतर असल्याचे बोलले जाते. पण, आज रोजी हे अंतर फार कमी झाले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धोक्याच्या क्षेत्रात आहे. पूर्वी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ ब्राह्मणडोह प्रसिद्ध होता. गावातील २० ते २५ वर्षांपूर्वीच्या अगोदरच्या काळातील शेकडो नागरिक याच डोहावर पोहण्यास शिकले असल्याचे बोलले जाते; पण आता मात्र नदीच्या विस्तारात हा ब्राह्मणडोह अस्तित्वातच राहिला नसल्याचे दिसते. तर, याच परिसरात शाळेच्याच बाजूला असलेल्या अनेक जुन्या खुणाही नामशेष झाल्या आहेत. कऱ्हा नदीच्या पात्रातून पाहिले, तर हा भाग उंचवट्यावर दिसतो. पण, याच उंचवट्याचा पाया नदीने हळूहळू गिळंकृत केल्याचे पाहावयास मिळते. यामुळे सध्या येथे शाडो या चिकट मातीचा थर आहे; पण हा थर संपत पोकळ भाग लागला. तर, एखाद्या पत्याच्या बंगल्यासारखे हे गाव कऱ्हा नदीपात्रात कोसळेल. सर्व होत्याचे नव्हते होईल. अशी परिस्थिती ओढवली तर सर्वप्रथम नदीचे पाणी गावाच्या ईभाड आळीतून गावात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी प्रशासनाने या भागाची पाहणी करून संरक्षक भिंत बांधण्याची गरज असल्याची मागणी गावचे नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)>याबाबत तीन ते चार वर्षांपूर्वी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन उपसरपंच गणेश खळदकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये या भागात संरक्षक भिंत व्हावी यासाठी ठराव करून गटविकास अधिकारी, तहसीलदार या शासनाच्या प्रतिनिधींना सादर केला होता; पण त्यावर अंमलबजावणी तर दूरच; पण साधी या भागाची पाहणीदेखील झाली नसल्याने प्रशासनाच्या या उदासीनतेवर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदास सुप्रिया सुळेव आमदार राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमत्री विजय शिवतारे यांनाही या धोक्याची कल्पना या नागरिकांनी दिली आहे; पण त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे प्रशासन व लोकप्रतिधी यांना येथे माळीण, उत्तराखंडसारखी परिस्थिती पाहायची आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पुरात जाऊ शकते निम्मे खळद गाव
By admin | Published: August 06, 2016 12:54 AM