राजेश खराडे, बीडदुष्काळाने ग्रामीण जीवनमान पुरते विस्कळीत झाले आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात गावच्या गावांनी आपला संसार चारा छावण्यांमध्ये थाटला आहे. चारा-पाण्यासोबत काहींची रोजगाराचीही सोय होत असल्याने शेतकऱ्यांना या छावण्यांचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे गावे ओस आणि छावण्या गजबजून गेल्याचे चित्र आहे.लिंबागणेश गटात ३२ गावांतील जनावरांकरिता २६ चारा छावण्या असून, जवळपास ३० हजार जनावरे तेथे आहेत. बेलखंडी गावालगत केशर महिला दूध व्यावसायिक सहकारी संस्थेची चारा छावणी आहे. सुरुवातीच्या काळात जनावरे जोपासण्याकरिता घरचा एक सदस्य छावणीत राहायचा. जलयुक्त शिवार अभियान, रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याने शेतमजुरांसह शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी अनेक शेतकरी कुटुंबीय छावणीत संसार थाटत आहेत. जनावरांच्या गोठ्याशेजारीच झोपडी उभारून मोजकेच संसारोपयोगी साहित्य आणून अनेक कुटुंबे वास्तव्यास आली असल्याचे चित्र नागझरी येथील छावणीत पाहावयास मिळाले. छावणीतच स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेच कुट्टी यंत्रावर काम मिळत असल्याचे संजय डोमरे या शेतकऱ्याने सांगितले. > छावणीतच ‘मेस’निरगुर्डी येथील १२ शेतकरी कुटुंबे गुराढोरांसह छावणीत आश्रयाला आहेत. गावापासून छावणी दूर असल्याने जेवणाची गैरसोय होत होती. रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागेल व हाताला काम मिळेल या हेतूने घुमरे कुटुंबीयांनी छावणीतच ‘मेस’ सुरू केली आहे. पिण्याच्या पाण्याची गावतल्या पेक्षा छावणीतच सोय होत असल्याचे बाबू घुमरे यांनी सांगितले.> हंडाभर पाण्यासाठीदहा वर्षीय मुलाचा मृत्यूविडा (जि. बीड) : केज तालुक्यातील विडा येथे गुरुवारी सकाळी हंडाभर पाण्यासाठी एका दहा वर्षीय मुलाला आपल्या प्राणास मुकावे लागले. पाणी शेंदत असताना तोल गेल्याने तो विहिरीत पडला. सचिन महादेव केंगार असे या मुलाचे नाव आहे. जाधव यांनी मित्र ज्ञानेश्वर वाळकेंसमवेत विहिरीकडे धाव घेतली. त्या दोघांनी सचिनला बाहेर काढले; पण तोपर्यंत सचिनचा मृत्यू झाला होता.> अद्यापपर्यंत उसाच्या वाढाचा चारा म्हणून उपयोग केला जात होता. कडबाही मिळणे मुश्कील झाले आहे. इतर जिल्ह्यांतून चाऱ्याची आवक करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकच्या अनुदानाची तरतूद करणे गरजेचे झाले असल्याचे छावणी चालक अल्ताफ शेख यांनीे सांगितले.
अर्ध्या गावाचा संसार छावणीत
By admin | Published: April 22, 2016 4:17 AM