ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले असून ३३ पैकी १० प्रभागात दोन शिवसेना, दोन भाजपा, तर काही ठिकाणी दोन राष्ट्रवादी, दोन काँग्रेस, दोन एमआयएम असे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना आता आपल्या समस्या सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ३३ प्रभागातून १३१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ८०५ उमेदवारांपैकी १३१ उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये चार प्रभागांचा एक पॅनल अशा पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. २०१२ मध्ये द्विपॅनल पद्धत होती, परंतु,त्यावेळेस अनेक प्रभागात एक काँग्रेस तर दुसरा राष्ट्रवादीचा, एक शिवसेनेचा तर दुसरा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा अशी काहीशी परिस्थिती होती. त्यामुळे प्रभागातील समस्या पाच वर्षे सुटूच शकल्या नाहीत. एका नगरसेवकाकडे गेले तर तुम्ही आम्हाला मतच दिले नाही तर मग आम्ही तुमचे काम कशाला करायचे अशी उत्तरे नागरिकांना मिळत होती. आता तर चार प्रभागांचा एक पॅनल झाल्याने चार नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये तब्बल १३ पॅनलमध्ये सर्वाधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. तर तीन पॅनलमध्ये भाजपा, तर सात पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु या ३३ प्रभागांमध्ये १० पॅनल असे आहेत, की ज्या ठिकाणी आता द्विधामनस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी आता नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी या नगरसेवकाकडून त्या नगरसेवकाकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागणार असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपाचे तीन नगरसेवक निवडून आले असून एक नगरसेवक हा शिवसेनेचा आहे. (प्रतिनिधी)>मतांची गणिते बाजूला सारणार का?प्रभाग क्रमांक ७ मध्ये तीन शिवसेना वएक काँग्रेस, १२ मध्ये दोन भाजपा दोन शिवसेना, १५ मध्ये तीन भाजपा एक शिवसेना, २० मध्ये तीन शिवसेना एक भाजपा, २२ मध्ये दोन भाजपा दोन शिवसेना, २४ मध्ये दोन शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि एक अपक्ष, २५ मध्ये तीन राष्ट्रवादी आणि एक शिवसेना, २६ मध्ये एक राष्ट्रवादी, दोन काँग्रेस आणि एक अपक्ष तर प्रभाग क्रमांक ३३ मध्ये दोन राष्ट्रवादी आणि दोन एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आता या प्रभागातील नागरिकांच्या समस्या हे नगरसेवक मतांची गणिते बाजूला सारुन सोडविणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आधे इधरवाले, आधे उधरवाले
By admin | Published: February 27, 2017 3:35 AM