पनवेल : बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. खारघरमधील काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर परीक्षा केंद्राचे नाव एका शाळेचे असताना परीक्षा आसनक्रमांक मात्र दुसऱ्या शाळेत आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खारघरमध्ये केपीसी ज्यु. कॉलेज, सतीश हावरे ज्यु. कॉलेज, हार्मोनी, ज्ञानज्योत आणि सत्याग्रह कॉलेज आदी शाळा-महाविद्यालये आहेत. या शाळेत जवळपास तीनशेहून अधिक परीक्षार्थींना बसण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कळंबोली येथे जावे लागत असे. मात्र येथील काही शाळांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, नवी मुंबई यांच्याकडे यासंदर्भात खारघरमध्ये स्वतंत्र केंद्राची मागणी केल्याने मागील काही वर्षांपासून खारघरमध्ये केंद्र सुरू करण्यात आले. मंगळवारी बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर आहे. येथील विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर सेक्टर सहामधील सेंट मेरी शाळेचे नाव असताना काही विद्यार्थ्यांना सेक्टर पाचमधील हार्मोनी स्कूलमध्ये परीक्षेचा आसनक्रमांक देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परीक्षा केंद्रात बदल करताना कोणतीच पूर्वकल्पना पालक तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता पालक गजानन चव्हाण यांनी सांगितले. रायगड जिल्हाधिकारी प्रकाश कोकाटे म्हणाले, सर्व शाळेला पत्र देवून माहिती कळविली आहे. सेंट मेरी शाळेपासून हार्मोनी शाळेत नेण्यासाठी बससेवा उपलब्ध करून द्यावी, असे सेंट मेरी शाळेला सांगितले आहे.
हॉल तिकीटवर नाव एका शाळेचे अन् परीक्षा दुसऱ्या शाळेत
By admin | Published: February 28, 2017 2:35 AM