मुंबई : दुरुस्तीसाठी परवानगी घेऊन प्रत्यक्षात बेकायदा मजले चढविणाऱ्या कुलाबा येथील एका इमारतीवर पालिकेने सोमवारी कारवाई केली. या इमारतीवरील कारवाईवर न्यायालयाने जैसे थेचा आदेश दिला होता. हा आदेश उठविल्यानंतर पालिकेने तत्काळ पोलीस बंदोबस्तात ही इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे.कुलाबा येथील राजवाडकर स्ट्रीटवर शनिदेव ही एकमजली इमारत होती. उपकरप्राप्त असल्याने ही इमारत म्हाडाच्या अखत्यारीत येते. इमारतीच्या मालकाने दुरुस्तीसाठी परवानगी घेऊन प्रत्यक्षात या ठिकाणी पाच मजली इमारत उभी केली. त्यामुळे पालिकेने संबंधित मालकावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू केली. बेकायदा मजल्यांचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने आॅक्टोबर २०१४मध्ये संबंधित विकासकाला काम थांबविण्याची नोटीस दिली होती. मात्र या नोटीसनंतरही काम सुरूच राहिले. तसेच नोटीसविरोधात विकासकाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जैसे थेचे आदेश दिल्यामुळे पालिकेला कारवाई लांबणीवर टाकावी लागली होती. अखेर हे आदेश उठविल्यानंतर पालिकेने सोमवारी कारवाईला सुरुवात केली. (प्रतिनिधी)
कुलाब्यातील इमारतीच्या बेकायदा मजल्यांवर हातोडा
By admin | Published: September 20, 2016 4:57 AM