- विशाल शिर्के-
पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांच्या केलेल्या नव्य २१ प्रवर्गानुसार दिव्यांगत्व प्रमाण वितरण करण्यास सुरुवात झाली असून, आता जिल्हा सरकारी रुग्णालयांबरोबरच पुणे, नागपूरसह सहा महानगरपालिकांच्या निवडक रुग्णालयात देखील दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे. या साठी महापालिका रुग्णालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यात दृष्टीदोष (अंधत्व), शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुविकलांगता अशा सहा प्रवर्गासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जात होते. त्यासाठी राज्य सरकारने सॉफ्टवेअर असेसमेंट फॉर डिसअॅबिलिटी महाराष्ट्र (एसएडीएम) ही प्रणाली विकसित केली होती. केंद्र सरकारने दिव्यांगत्व वर्गवारीत आणखी १५ प्रवर्ग समाविष्ट केल्याने दिव्यांग प्रवर्गाची संख्या सहा वरुन २१ इतकी झाली आहे. त्यासाठी स्वावलंबन कार्ड हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या माध्यमातून दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्यातील एसएडीएम ही प्रणाली बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या २०११सालच्या जनगणनेनुसार राज्यात २९ लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. नव्या प्रवर्गामध्ये वाचादोष, मज्जासंस्थेचे आजार अशा विविध वर्गवारींची भर घालण्यात आली आहे. त्यांना देखील दिव्यांग योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिकांची रुग्णालयांमधून दिव्यांगांच्या प्रकारानुसार दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, पीसीएमसी, ठाणे, नागपूर, नाशिक आणि बृहन्मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये ही सुविधा देण्यात येईल. पुण्यातील कमला नेहरु, पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम, औंधमधील जिल्हा रुग्णालय, ससून, तसेच मंचर येथील उपविभागीय रुग्णालयातून नव्या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्यात येतील. जिल्हा व सामान्य रुग्णालयातून दर आठवड्याच्या बुधवारी दिव्यांगत्व तपासणी आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरीत केले जाईल. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमधून शुक्रवारी तपासणी आणि प्रमाणपत्र वितरणाचे काम चालेल. दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी एखादी व्यक्ती पात्र नसल्यास त्याची कारणे नमूद करण्याची सूचना आदेशात करण्यात आली आहे. -----------------------कसा कराल अर्ज
दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी ६६६.२६ं५ं’ेंुंल्लूं१.िॅङ्म५.्रल्ल या संक्तेस्थळावर अर्ज करता येईल. आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा/महाविद्यालयाचे अेलखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड वाहन परवाना हा ओळख पुरावा, निवासासाठी लाईट बिल, मिळकर पावती, सात-बारा उतारा, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, घरपट्टी, पाणीट्टी, शिधापत्रिका या पैकी एक पुरावा लागेल. पासपोर्ट आकाराची नजीकच्या काळातील दोन छायाचित्रे.