सचिन देव,
पिंपरी- अपंग बाधवांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वे स्थानकावर अपंगांसाठी सर्व सुविधा असल्याचे दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र, लोकमतने पिंपरी, आकुर्डी व चिंचवड येथील स्टेशनवर केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये अपंगांसाठी अनेक ठिकाणी असुविधा असल्याचे दिसले.आकुर्डी रेल्वे स्थानक वगळता इतर ठिकाणी रॅम्पवॉक नसल्यामुळे अपंग व्यक्तीला व्हीलचेअरसह उचलून रेल्वे गाडीत बसवावे लागते. अपंगांच्या डब्यातदेखील इतर प्रवासी बसल्यामुळे अपंगांना बसण्यासाठीदेखील जागा नसल्याचे दिसून आले. आकुर्डी स्टेशनप्रमाणे या ठिकाणीदेखील रॅम्पवॉक बसविण्याची प्रवाशांतर्फे मागणी करण्यात येत आहे. अपंगांप्रमाणेच वयोवृद्धांनादेखील या जिन्यावरून चढताना त्रास होतो. सर्व गाड्या या स्थानकावर थांबत असतानादेखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे व्यावसायिकाने सांगितले.पिंपरी, चिंचवड, आकुर्डी येथील स्थानकावर रेल्वेगाडी आणि लोकलला असलेला स्वतंत्र अपंगांचा डबा स्टेशनावर गाडी आल्यावर कोणत्या ठिकाणी डबा येईल, याची माहिती असलेला फलक नसल्यामुळे अपंग बाधवांचे हाल होत आहेत. चिंचवड स्टेशनवर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबत असून, या ठिकाणी गाडी येण्यापूर्वी अपंगासांठी असलेल्या डब्यांची माहितीदेखील दिली जाते. त्यामुळे अपंगबांधव त्या ठिकाणी येऊन थांबतात. मात्र, पिंपरी, आकुर्डी या ठिकाणी कोणतीही सूचना करण्यात येत नसून, फलकदेखील लावण्यात आलेला नाही. त्यामुळे गाडी आल्यावर डबा पकडण्यासाठी इतर प्रवाशांना विचारावे लागत आहे. >पिंपरी स्टेशन दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका व्यक्तीला गाडीत बसविण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधी व्हीलचेअर घेण्यासाठी स्टेशन मास्तरांकडे गेला. यावेळी स्टेशनच्या कर्मचा-याने अपंग असल्याचे ओळखपत्र दाखवून व्हीलचेअर घेऊन जाण्याचे सांगितले. त्यानंतर अपंग व्यक्तीला प्लॅटफार्मवर कशा पद्धतीने घेऊन जाऊ असे विचारले. त्यावर संबंधित कर्मचारी यांनी स्टेशनवर रॅम्पवॉकची सुविधा नसल्यामुळे , व्हीलचेअर उचलून गाडीत बसवावे लागणार असल्याचे उत्तर दिले. स्टेशनवर लोकल आल्यानंतर अपंगांचा डबा कोणत्या ठिकाणी लागणार असल्याचे विचारल्यावर त्यांनी इंजिनाजवळ असल्याचे मोघमपणे सांगितले. त्यानुसार प्रतिनिधी पुण्याहून लोणवळा जाणारी लोकल आल्यावर, अपंगांच्या डब्याची पाहणी केली असता, तो डबा इंजिनापासून तिसऱ्या स्थानी असल्याचे दिसून आले. दरम्यान, या ठिकाणीच एका रेल्वे कर्मचाऱ्याने पुणे स्टेशनवर अपंगांसाठी सर्व सुविधा आहेत. मात्र, या ठिकाणी तेवढी सुविधा नसल्यामुळे नागरिक अपंग व्यक्तीला उचलून गाडीत बसवित असल्याचे दिसले.अपंग व्यक्तीला लोकलमध्ये बसविण्यासाठी येथील स्टेशन मास्तरांकडे व्हीलचेअरची मागणी केली असता, त्यांनी तत्काळ उपलब्ध करून दिली. मात्र, स्टेशनमध्ये अपंग व्यक्तीला कसे आणायचे, यावर स्टेशन मास्तरांनी रॅम्पवॉकची सुविधा नाही. त्यामुळे तुम्हाला व्हीलचेअरसह त्या व्यक्तीला उचलून गाडीत बसवावे लागणार असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर जिन्याची उंची मोठी असल्यामुुळे अपंग व्यक्तीला स्टेशनवर आणताना खूप हाल होतील, काही दुसरा उपाय आहे का, या संबंधी विचारले असता, स्टेशन मास्तरांनी दुसरा मार्ग नाही. तुम्हाला अपंग व्यक्तीला उचलूनच आत आणावे लागेल. तुमच्या मदतीला गरज वाटल्यास रेल्वेचा एक कर्मचारी येईल असे सांगितले. त्यानंतर प्रतिनिधीने व्हीलचेअर घेऊन अपंग व्यक्तीला आणण्याचा प्रयत्नदेखील केला. या वेळी तेथील एका व्यावसायिकाने अपंग व्यक्तीला स्टेशनमध्ये जाण्यासाठी रॅम्पवॉक नसल्यामुळे कुटुंबीयांना त्या व्यक्तीला उचलून घेऊन जावे लागते.येथील स्टेशन मास्तर यांच्याकडे अपंग व्यक्तीला लोकलने पुण्याला घेऊन जायचे असून, व्हीलचेअर मिळण्याची मागणी केल्यावर त्यांनी अपंगाचे ओळखपत्र दाखवून व्हीलचेअर घेऊन जाण्यास सांगितले. तसेच त्या व्यक्तीला गाडीत बसविल्यानंतर व्हीलचेअर लगेच आणून देण्याचीही सूचना केली. त्यानंतर अपंग व्यक्तीला गाडीत कशा पद्धतीने बसविण्यासंबंधी विचारल्यावर, स्टेशन मास्तरांनी स्टेशनाच्या दोन्ही बाजूला रॅम्पवॉकची सोय आहे. त्यावरून तुम्ही स्टेशनमध्ये व्हीलचेअर आणून गाडीत बसविण्याचे सांगितले. त्यानंतर स्टेशनवर लोकल आल्यावर अपंगांचा डबा कोणत्या ठिकाणी येणार असल्याचे विचारल्यावर त्यांनी मध्यभागी येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रतिनिधी लोकल आल्यावर मध्यभागी येऊन उभा राहिला असता, अपंगाचा डबा मात्र इंजिनाजवळ लागलेला असल्याचे दिसून आले आणि त्या डब्यात एकही अपंग दिसून न येता, इतर प्रवाशांनी हा डबा हाऊसफुल झालेला दिसून आला.