रमेश पाटील - कसबा बावडा -दिवाळी सणामुळे बोनस, पगारासाठी लाखो रुपयांच्या रकमेचे व्यवहार होतात. त्यामुळे मोठी कॅश नेणाऱ्या ग्राहकांना आता बँकांकडून सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. कॅश नेताना कोणत्याही प्रकारचा दगाफटका बसू नये, म्हणून बँकांकडून काही मौलिक सूचनाही देण्यात येत आहेत.दिवाळी सणावेळी लहान बँका, तसेच मोठमोठ्या कंपन्यांकडून रोख रक्कम पाच लाखांपासून ते एक कोटीच्याही पुढे काढली जाते. काही कंपन्यांचे पगार जरी खात्यावर जमा होत असले, तरी लहान कंपन्या अजूनही आपल्या कर्मचाऱ्यांना रोखीने पगार देतात. त्यातच दिवाळीमुळे पगार व बोनस, अशी रक्कम दिली जाते. साहजिकच कंपन्यांकडून एकाचवेळी मोठी रक्कम काढली जाते. अशी रक्कम नेताना मोठी सावधानता बाळगावी लागते.दरम्यान, बँकांत अशा प्रकारची मोठी रक्कम काढणाऱ्या ग्राहकाला काउंटरवर रक्कम न देता त्याला बँकेच्या आत बोलावून रक्कम दिली जाते. जेणेकरून अमूक एका व्यक्तीकडे मोठी रक्कम आहे, याचा कोणाला सुगावा लागू नये. कॅश दिल्यानंतर ती कॅश संबंधित व्यक्तीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर बँकेत फोन करा, अशा सूचनाही काही बँका आपल्या ग्राहकांना करीत आहेत.एकंदरीत मोठ्या बँका आपल्या ग्राहकाला पैसे देताना त्याची काळजी घ्या, अशा सूचना करू लागल्याने ग्राहक तर सावध होत आहेतच, शिवाय या सूचनांमुळे त्याला बँकेबद्दल आपुलकी वाटत आहे. (प्रतिनिधी)ही दक्षता घ्या...मोठी कॅश शक्यतो चारचाकी वाहनांतून न्या. सोबत सिक्युरिटी गार्ड असू दे. कॅशची गोपनीयता पाळा. कॅश घेतल्यानंतर सरळ आपल्या ठिकाणी जा. कॅश नेताना अलार्म असलेल्या बॅगेचा उपयोग करा, अशा प्रकारच्या सूचना सध्या बँकांचे कॅशिअर, अधिकारी आणि बँकांचे सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून देण्यात येऊ लागल्या आहेत.
मोठी कॅश हाताळता... तर सावधान !
By admin | Published: October 22, 2014 9:18 PM