नाशिक : महापालिका निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन संगणकीयप्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करणे बंधनकारक केले असले तरी एकाच वेळी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे सर्व्हरला गतिरोध निर्माण होत आहे. आॅनलाइनप्रणाली हॅँग होत असल्याने उमेदवार परेशान होत असून, त्यामुळे इच्छुकांच्या जिवाची घालमेल मात्र वाढली आहे. आता नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असल्याने आॅनलाइन अर्जासह प्रत्यक्ष अर्जाची प्रत निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यासाठी उमेदवारांची मोठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी दि. २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. पाच दिवसांत सहाही विभागांत केवळ ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी (दि.३१) माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु अद्याप प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या रखडल्याने उमेदवारांनी निवडणूक कार्यालयांकडे न फिरकणेच पसंत केले. मात्र, इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाइन संगणकीयप्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ६२६ उमेदवारांनी आॅनलाइनप्रणालीद्वारे अर्ज भरून ठेवले. त्यात असंख्य उमेदवारांनी अपक्षासह प्रमुख राजकीय पक्षाच्या नावानेही नामनिर्देशनपत्र भरून ठेवले आहेत. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ३५५ उमेदवारांनी आॅनलाइनप्रणालीद्वारे अर्ज भरून ठेवले होते. त्यात चोवीस तासांत २७१ उमेदवारांची भर पडली आहे. मात्र, आॅनलाइनप्रणालीद्वारे अर्ज भरताना संगणक हॅँग होण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने शिवाय एकाच वेळी संकेतस्थळावर ताण येत असल्याने सर्व्हरलाही गतिरोध निर्माण होत असल्याने उमेदवारी अर्ज भरताना व्यत्यय येत आहे. अर्ज भरताना लॉगीन करण्यापूर्वीच संकेतस्थळ हॅँग होत असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेच्या मुख्य निवडणूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. प्रामुख्याने, लॉगीननंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मध्येच संकेतस्थळ हॅँग होऊन पुन्हा प्रक्रिया करावी लागत असल्याच्याही वाढत्या तक्रारी आहेत.
आॅनलाइनप्रणाली हॅँग; उमेदवार लटकले!
By admin | Published: February 01, 2017 1:49 PM