लातूर : भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने केलेल्या तपासणीत त्रुटी आढळल्याने लातूर व कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी ५० जागांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
लातूर व कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी १५० जागा मंजूर आहेत. दरम्यान, २८ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या पथकाने तपासणी केली. त्यामध्ये लातूर येथे ९ सहयोगी प्राध्यापकांची व १५ सहायक प्राध्यापकांची पदे मंजूर नाहीत. तसेच पदव्युत्तर व आंतरवासिता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाही. अध्यापन कक्ष कमी आहेत. या त्रुटींची पूर्तता शासनस्तरावर केली जात आहे. त्यानुसार वसतिगृहासाठी ४८ कोटी, तर अध्यापन कक्षासाठी ३ कोटी ३८ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. २०१८च्या तपासणीमध्येही याच त्रुटी आढळल्या होत्या.
त्रुटींची पूर्तता केली जाईल. त्यामुळे लातूर व कोल्हापूर येथील दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा कमी होणार नाहीत. शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, पूर्वीच्याच मंजूर जागा कायम राहतील. - डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण संचालक