मुंबई : नवी मुंबई महापालिकेने सिडकोबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन करीत सिडकोच्या भूखंडावर हिरानंदानी हेल्थकेअर प्रा. लि.ला ना नफा ना तोटा तत्त्वावर रुग्णालय चालवण्याची परवानगी दिली. त्यामुळे सिडकोने नवी मुंबईबरोबर केलेला करार रद्द केला. याप्रकरणी महापालिकेने राज्य सरकारची मदत मागितल्याने उच्च न्यायालयाने या भूखंडाबाबत राज्य सरकारला येत्या तीन आठवड्यांत निर्णय घ्यायला सांगितले आहे.रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळावेत, यासाठी नवी मुंबईच्या हद्दीत ना नफा ना तोटा तत्त्वावर रुग्णालये सुरू करण्यात यावीत, याकरिता सिडकोने नवी मुंबई महापालिकेबरोबर करार करून काही भूखंड महापालिकेच्या ताब्यात दिले. मात्र महापालिकेने करारातील नेमक्या या अटींचे उल्लंघन करून नफा कमावणाऱ्या हिरानंदानी हेल्थ प्रा. लि. ला अगदी किरकोळ दरात सिडकोचा भूखंड हस्तांतरित केला. याविरुद्ध नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेच्या सुनावणीवेळी सिडकोचे वकील जी. एस. हेगडे यांनी १८ जानेवारी रोजी सिडकोला करार रद्द करण्याबाबत नोटीस बजावल्याची माहिती खंडपीठाला दिली. तर नवी मुंबईच्या महापालिकेच्या वकिलांनी याप्रकरणी राज्य सरकारची मदत मागितल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने येत्या तीन आठवड्यांत राज्य सरकारला नवी मुंबई महापालिकेच्या अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
‘हिरानंदानी’वर टांगती तलवार
By admin | Published: February 20, 2016 3:19 AM