संगमनेर (जि. अहमदनगर) : संगमनेरात मानाच्या हनुमान मिरवणुकीचा रथ शेकडो रणरागिणींनी ओढून ८७ वर्षांची ऐतिहासिक परंपरा शुक्रवारी पुन्हा एकदा जपली. महिलांना मंदिरात प्रवेश देण्यावरून देशभर वाद सुरू असताना संगमनेरमध्ये मात्र अनेक वर्षांपूर्वी महिलांनीच समतेचा झेंडा रोवला आहे.शेकडो महिलांनी ‘बजरंग बली की जय’चा नारा देत झुंबराबाई शिंपी यांचे स्मरण करून रथाचे सारथ्य केले. रथास बांधलेला दोर महिलांनी ओढून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रंगारगल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, वाल्मिक चौक, नगर परिषद, महात्मा फुले चौक, साईनाथ चौक, चावडी, मेनरोड, नेहरू चौक मार्गे वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दुपारी दोन वाजता पुन्हा चंद्रशेखर चौकात महाआरती होवून मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. मिरवणुकीस चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक अजय देवरे हे आपल्या सहकाऱ्यांसह शहर पोलीस ठाण्यापासून मानाचा भगवा ध्वज हातात घेत चंद्रशेखर चौकात पोहचले. ध्वज हनुमान मिरवणुकीच्या रथावर लावून देवरे यांच्या हस्ते धार्मिक विधी व पूजा करण्यात आली. अग्रभागी असलेल्या शंखनाद ढोल पथकाने रथाला जोरदार सलामी दिली. (प्रतिनिधी)
महिलांनी ओढला हनुमान रथ
By admin | Published: April 23, 2016 3:55 AM