ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5- रस्त्यांची आणि स्टेशनची नावं बदलण्याचा आग्रह अनेक राजकारण्यांचा असतो. या नामकरणाच्या बाबतीत भगवान हनुमानाला राजकारण्यांनी सोडलं नाही. अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमानाचं काळबादेवीतल्या एका रस्त्याला दिलेलं नाव पालिकेनं बदललं आहे. सुपरमॅनलाही उडण्याच्या बाबतीत मागे टाकतील इतकं भगवान हनुमान यांचं अफाट सामर्थ्य. मात्र राजकारण्यांनी त्यांच्या नावाबाबतही राजकारण करण्यास मागे-पुढे पाहिलं नाही.
मुंबईतल्या काळबादेवी परिसरातल्या जुनी हनुमान गल्लीचं काही वर्षांपूर्वी धीरूभाई पारेख मार्ग नावानं नव्यानं नामकरण करण्यात आलं होतं. त्याबाबत आक्षेप नोंदवत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींनी मुंबई महापालिकेला नाराजीचं पत्रही लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी भगवान हनुमानचं नाव का बदललं याचा पालिकेला जाब विचारला आहे. गलगलींनी पत्रात म्हटलं आहे की, 'हनुमान हा ब्रिटिश देव नव्हता. तेव्हा त्याचं नाव एका माणसाच्या नावाच्या स्वरूपात का बदललं. काळबादेवीत दोन हनुमान मंदिरं गेल्या 100 वर्षांपासून स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. अनेकांची भगवान हनुमानावर श्रद्धा आहे. तेव्हा त्या रस्त्याचं पहिलं नावच पुन्हा त्या रस्त्याला देण्यात यावं, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे गलगलींनी केली आहे.
भायंदर पश्चिमेकडच्या महात्मा गांधी फुले रोडचं नाव बदलण्याचाही बिल्डरनं घाट घातला होता. मात्र त्यालाही स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. दुसरीकडे गुरगावचंही पुन्हा नामकरण करून गुरूग्राम असं करण्यात आलं. याबाबतचही सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिमल्याचं नामकरण श्यामला करण्यालाही स्थानिकांच्या विरोधाखातर टाळल्याची माहिती अनिल गलगली यांनी दिली आहे. 2012ला वांद्र्याच्या पेरी क्रॉस रोडचं नामकरण गायक जगजित सिंगच्या नावे प्रस्तावित होता. मात्र त्यावेळी पालिकेला 1980मध्ये मास्टर विनायक क्रॉस रोड हे नाव बदलून पेरी क्रॉस रोड ठेवल्याचं निदर्शनास आलं. सध्या तो रोड पेरी क्रॉस रोड या नावानं ओळखला जातो आहे.