मुंबई : विक्रोळी पार्क साइट येथील हनुमाननगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करणारे, सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, विकासकाने लाच म्हणून दिलेल्या १ कोटी रुपयांपैकी ६० लाख रुपये खर्च केल्याची कबुली येवले यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान येवले केवळ पुनर्विकास प्रकल्पात खोडा घालत असल्याचा आरोप करत, रहिवाशांनी पत्रकार संघाच्या प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी केल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.गेल्या चार वर्षांपासून विकासकाविरोधात लढा देत असताना घेतलेल्या जाहीर सभा, पाठपुरावा यासाठी ६० लाख खर्च केल्याचे येवले म्हणाले. उरलेले ४० लाख रुपये पोलीस आयुक्तांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अंमलबजावणी संचालनालय, आर्थिक गुन्हे शाखा आणि मुख्यमंत्र्यांकडे देण्यास गेलो होतो. मात्र, कुणीही ते स्वीकारले नाहीत. त्यामुळे विकासकांचा या यंत्रणांवर दबाव असल्याचा आरोप येवले यांनी केला. परिणामी, पैसे स्वीकारत नसल्याने आदिवासी आणि अपंगांसाठी सदर पैसे खर्च करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तर रहिवाशांनी येवलेंविरोधात पत्रकार परिषदेदरम्यान निदर्शने केली.स्थानिकांचा आरोप-येवले प्रामाणिक आहेत, तर त्यांनी विकासकाकडून घेतलेले पैसे दोन महिने स्वत:कडे का ठेवले? त्यातील ६० लाख रुपये कोणत्या हक्काने खर्च केले? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांच्याकडे नाहीत, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.पुनर्विकासचधोक्यात येईल!विकासकाने संक्रमण शिबिरातील रहिवाशांसाठी व्यायामशाळा, पुस्तक पेढी, महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारले आहे. गेल्या चार वर्षांपासून हाउसकीपिंगच्या सुविधा मोफत मिळत आहेत.मात्र, येवलेंकडून प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सर्व सुविधा बंद होऊन, प्रकल्प पुन्हा गोत्यात येण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली.
हनुमाननगर झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळा; संदीप येवले येणार अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 4:06 AM