राज्यात जिल्हा परिषदा व महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत यावेळी घराणेशाहीचा चांगलाच दबदबा राहिला. काही नेत्यांच्या घरातील तब्बल तीन-तीन उमेदवारांनी बाजी मारली तर काही नेत्यांच्या घरातील दोनपैकी एका सदस्याला विजय मिळाला तर दुसऱ्याला पराभवाशी सामना करावा लागला. राजकारणात सक्रिय असलेल्या कुटुंबातील अनेक सदस्यांना या निवडणुकीत विजय मिळाला. त्या तुलनेत पराभूत झालेल्यांची संख्या कमी असल्याचे नातेवाईकांच्या जयपराजयाच्या विश्लेषणातून स्पष्ट होते. ज्येष्ठ माजी मंत्री ए.टी. पवार यांच्या कुटुंबातील चक्क तीन सदस्यांना मतदारांनी नाशिक जिल्हा परिषदेत पाठविले आहे. जयश्री पवार व भारती पवार या त्यांच्या दोन स्नुषा आणि नितीन पवार हे पुत्र या तिघांनी या निवडणुकीत बाजी मारली. नांदेड जिल्हा परिषदेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण आणि कन्या प्रणिता यांंनी बाजी मारलीे. माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके आणि पुत्र जयसिंह सोळंके हे दोघे बीड जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत जाण्यात आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे आणि पुत्र रणजित शिंदे हे यशस्वी ठरले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांची पत्नी परिशा आणि मुलगा पूर्वेश या दोघांनी ठाणे मनपामध्ये बाजी मारली. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांचे पुतणे मंदार यांना ठाणे मनपा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र विचारे यांच्या पत्नी नंदिनी येथे विजयी ठरल्या आहेत. गडचिरोलीत माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या एका कन्येला (तनुश्री) पराभव पत्करावा लागला तर दुसरी कन्या (भाग्यश्री) गडचिरोली जिल्हा परिषदेत पोहोचल्या. आमदार निर्मला गावीत यांची कन्या नयना गावीत यांनी नाशिक जि.प.मध्ये बाजी मारली तर त्यांचे पुत्र हर्षल गावीत यांना मतदारांनी नाकारले. बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे पुत्र ऋषी जाधव यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. अकोल्यात माजी राज्यमंत्री अजहर हुसन्ौ यांचे पुत्र डॉ. जिशान यांनी अकोला मनपा निवडणुकीत विजय मिळविला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे पुत्र समीर आणि खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य हे दोन खासदारपुत्र नाशिक जिल्ह परिषदेत जाण्यात अपयशी ठरले. यवतमाळ जिल्हा परिषदेत राज्यमंत्री संजय राठोड यांचे बंधू विजय राठोड विजयी झाले आहेत. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मात्र त्यांचे पुत्र सागर खोत यांना सांगली जिल्हा परिषेदत पोहोचवता आले नाही. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांचे औरंगाबाद जि.प.मध्ये जाण्याचे स्वप्न मतदारांनी साकार होऊ दिले नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संजना या कन्या आहेत. औरंगाबादेत रामकृष्णबाबा पाटील एक स्नुषा प्रतिभा काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाल्या तर दुसरी स्नुषा व्ैौशाली यांनी शिवसेनेच्या तिकिटावर बाजी मारली. जालन्यात मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर विजयी झाले आहेत. उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना यशस्वी ठरल्या आहेत. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड सांगली जि.प.मध्ये जाण्यात अपयशी ठरले. कोल्हापुरात माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे नातू वीरेंद्र मंडलिक यांना पराभवाशी सामना करावा लागला. कोल्हापूर जि.प.मध्ये भाजपा आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शोमिका यांनी विजय प्राप्त केला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित यांना मतदारांनी सांगली जि.प.मध्ये पाठविले. याच जि.प.मध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनी बाजी मारली. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख यांनी मनपा निवडणुकीचा फड जिंकला. अहमदनगर जिल्हा परिषदेत माजी मंत्री बबनराव ढाकणे यांची स्नुषा प्रभावती ढाकणे आणि आमदार अरूण जगताप यांच्या स्नुषा सुवर्णा यांनी बाजी मारली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते रामकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पुन्हा जि.प.मध्ये पोहोचल्या आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख हे लातूर जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत. शेकापच्या नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांना त्यांच्या स्नुषेला (चित्रा) रायगड जिल्हा परिषदेत पाठविण्यात यश मिळाले आहे. शेकाप आमदार सुभाष पाटील यांची पत्नी सुश्रृता रायगड जिल्हा परिषदेत पोहोचल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना त्यांच्या मुलींना जिल्हा परिषदेत पाठविण्यात यश मिळाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आदिती यांनी रायगड जि.प.मध्ये तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची कन्या आशा पांडे यांनी जालना जिल्हा परिषेदत बाजी मारली.
- प्रेमदास राठोड -