ऑनलाइन लोकमत
भगवानगड, दि. 11 - भगवानगडाच्या पायथ्याशी आयोजित दसरा मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मी अहंकाराचा, कारस्थानाचा बुरुज तुमच्यासाठी उतरले, असे म्हणत धनंजय मुंडे आणि नामदेवशास्त्री यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा यंदा वादात सापडला होता. विजयादशमीला भगवानगडावर राजकीय भाषण होवू देणार नाही, अशी महंत नामदेवशास्त्री सानप यांची भूमिका होती. त्या पार्श्वभूमीवर एक महिन्यापासून महंत आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद सुरू होता. गडाऐवजी पायथ्याशी मेळाव्याला परवानगी देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी मात्र ठाम राहत भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर गडाच्या पायथ्याशी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्री राम शिंदे, मंत्री महादेव जानकर, मंत्री सदाभाऊ खोत, खा. प्रितम मुंडे यांच्यासह नगर व बीड जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे -
- मी माझ्या भावांसाठी खूप लढत आहे. भगवान बाबांच्या आशिर्वादाने सदाभाऊ खोत, महादेव जानकर, राम शिंदे या माझ्या सर्व भावांना मी लाल दिवा दिला आहे.
- भगवानगडाचं आणि माझं नातं बाप- लेकराचं आहे.
- शिवाजी महाराजांच्या राज्यात भगवान बाबांच्यासारखे संत होऊन गेले.
- भगवान बाबानी वैभवाची परंपरा दिली आहे.
- मी आयुष्यात कधीही कोणतीही चूक केली नाही,आणि करणारही नाही.
- मी माझ्या लेकारांसाठी भगवान गडावर आले .
- भगवान गडला बाप मानलं त्याच्या विरोधात बोलणार नाही.
- मी आधी भगवान बाबांची भक्त, त्यानंतर मंत्री.
- माझ्या वडिलांच्या अस्थी भगवान गडावर आणल्या तेव्हा या गडाची मुलगी झाले.
- मी अहंकाराचा, कारस्थानाचा बुरुज तुमच्यासाठी उतरले, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे, नामदेवशास्त्री यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
- इंजिनीअरिंगला प्रवेश मिळालेल्या ऊस तोडणी कामगाराच्या मुलाला २१ हजार रुपये शिष्यवृत्ती मुंडे प्रतिष्ठानकडून देणार.
- हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्येचा राक्षस संपवू टाका.
- ऊस तोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्यांऐवजी पुस्तके द्यायचं माझं स्वप्न आहे.
- मला अहंकार नाही, पण स्वाभिमान आहे.
- गोपीनाथ मुंडे यांनी मला गडाचा धार्मिक वारसा दिला, गडाने मला कन्या मानले आहे.
- माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आणि राजीनामे मागण्या-यांवर टीका
- वर्षानुवर्षे सत्ता भोगणा-यांनी मराठी तरुणांसाठी काय केलं नाही, नुकसान केलं.
- स्व:ताच्या फायद्यासाठी लोक राजकरण करत आहेत.
- पुढच्या मेळाव्याला मला महंतच मुलगी म्हणून गडावर बोलवितील.
- लेक म्हणून गडाबाबत अपशब्द काढणार आहे.
बारामतीचे वाटोळे करणार- महादेव जानकरमहादेव जानकर म्हणाले, परळीचा चमचा आणि बारामतीची सुपारी आहे. मात्र पंकजा वाघीण आहे, हे लक्षात ठेवा. संतांनी कोणाचे चमचे व्हायचे नसते. विरोधीपक्षनेतेपदाचा चमचा घेवून तो पुढे आला आहे. आम्ही असे चमचे घेवून पुढे आलेलो नाहीत. भाजप मुंडे यांच्या पाठीशी राहिल की नाही ते सांगता येत नाही, मात्र माझा पक्ष सदैव पाठीशी आहे. त्यामुळेच बारामतीची वाट लावल्याशिवाय राहणार नाही, हे एका ब्रह्मचाऱ्याचे विधान खोटे ठरणार नाही.