पुणे: ‘पद्मविभूषण’ देऊन राष्ट्राने केलेल्या गौरवाचा अक्षय आनंद झाला असल्याची भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. तसेच ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाची सुधारित आवृत्ती करण्याचे काम सध्या सुरू आहे. नव्या संशोधनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळे पैलू प्रकाशात येत असल्याने शिवचरित्रामध्ये सतत भर पडत आहे. ही माहिती चित्रे आणि नकाशांसह नव्या आवृत्तीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी (मंगळवारी)जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी आदरपूर्वक प्रदान करण्यात आला.पुरंदरे यांना भारत सरकारने सन 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला होता. 11 मार्च 2019 रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यास वैयक्तिक कारणास्तव बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी राम यांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्कार ( पद्म विभूषण पदक, मिनिएचर व सनद (प्रमाणपत्र) आदरपूर्वक प्रदान केला. यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.’मी अगदी सामान्य माणूस आहे. मी कोणताही पराक्रम केला नाही आणि कर्तृत्व गाजविले नाही. आयुष्यभर केवळ शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. तुम्हा रसिकांच्या प्रेमाने शिवशाहीर झालो. आता ‘पद्मविभूषण’ देऊन राष्ट्राने केलेल्या गौरवाचा अक्षय आनंद झाला असल्याची भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, मी जन्माला आलो तेव्हा आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते. त्याकाळात ’सर’ वगैरेसारख्या अनेक पदव्या मिळत होत्या. मात्र स्वातंत्र्यातील सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखांनी माझा गौरव केला याचा अधिक आनंद आहे. ’राजा शिवछत्रपती’ या ग्रंथांची आवृत्ती वेगळ्या स्वरूपात करण्याची इच्छा आहे. संशोधनातून नवीन संदर्भ मिळत आहेत. त्यांचा समावेश नव्या आवृत्तीमध्ये केला जाणार आहे. या नव्या आवृत्तीस तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. १४ एप्रिल १९८४ रोजी ‘जाणता राजा’ या महानाट्याचा पहिला प्रयोग झाला होता. गेल्या ३५ वर्षांत मराठी हिंंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये मिळून दीड हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. आता अमेरिकेमध्ये ‘जाणता राजा’चे प्रयोग होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विलक्षण प्रेम करणारे जहांगीर वजीफदार यांनी रायगड आणि राज्याभिषेक या विषयांवर तब्बल १२३ चित्रे चितारली आहेत. दुदैर्वाने गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. या चित्रांवर आधारित पुस्तकाची निर्मिती होत असून त्यातील प्रत्येक चित्राचे वैशिष्ट्य मी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे पुरंदरे यांनी सांगितले.------------------------------------------------------------