नागपूर : भारतीय भाषांप्रति आवड व स्वाभिमान वाढवा. त्यातून चेतना निर्माण होईल तेव्हा कुठे मातृभाषेत बोलताना वाटणारा कमीपणा, मनात निर्माण होणारा न्यूनगंड अशा सर्व समस्या आपोआपच दूर होतील, असे आवाहन अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस व राज्यसभा सदस्य व शिक्षणतज्ज्ञ जनार्दन द्विवेदी यांनी केले. बहुतांश भारतीय भाषांचे हे वैशिष्ट्य आहे. ज्या भाषेत जे बोलले जाते तेच लिहिले जाते. त्यामुळे या वैज्ञानिक भाषा आहेत. अशा वैज्ञानिक भाषा ज्या देशात असतील त्या देशाला अकारण चिंता करण्याची गरज नाही, असा विश्वासही त्यांना व्यक्त केला. ‘लोकमत समाचार’तर्फे नीरीच्या विशेष सहकार्याने ‘हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी केले जाणारे प्रयत्न व आम आदमीची भूमिका’ या विषयावर रविवारी विचार सत्र झाले. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र होते. राज्यसभा सदस्य व ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे विशेष अतिथी होते. द्विवेदी म्हणाले, भारतीय भाषांना महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात व्यवस्थेची नाही तर सामान्य माणसाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळेच भारतीय भाषा जिवंत आहेत. कमी लेखण्याच्या वृत्तीमुळेच हिंदी व अन्य भाषांची अशी दशा झाली आहे. ‘विचार सत्र’चे अध्यक्ष म्हणून बोलताना कुलगुरू गिरीश्वर मिश्र म्हणाले, आपल्या भाषेत संवाद साधताना, व्यवहार करताना कोणताही कमीपणा किंवा लाज वाटू नये. आपल्या भाषांबाबत आपण मनात अनावश्यक भीती निर्माण केली आहे. ती भीती बाहेर काढावी लागेल. सध्या समाजात हिंदी व इंग्लिशचे मिश्रण असलेली ‘हिंग्लिश’ च्या रूपात आणखी एक भाषा आली आहे. त्यामुळे आता हिंदी भाषेचाच नव्हे तर हिंदी समाजाच्या अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भाषेबाबत आवश्यक असलेले प्रश्न लावून धरत वृत्तपत्राच्या रूपात ‘लोकमत’ आपली भूमिका चोखपणे बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले. खा. दर्डा म्हणाले, हिंदी कोणत्या एका क्षेत्रात किंवा एका बोलीपासून विकसित झालेली भाषा नाही. तिच्या विकासात उर्दूपासून ते भारतातील बऱ्याच भाषा व बोलींचे योगदान आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय एकतेच्या रूपात हिंदी राष्ट्रभाषा म्हणून समोर आली. मात्र, स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शासकीय कामकाजाची भाषा म्हणून हिंदीला ते स्थान प्राप्त झाले नाही, जो तिचा संवैधानिक हक्क होता. महाराष्ट्राने हिंदीची प्रचंड सेवा केली आहे. राष्ट्रीय एकतेच्या हितासाठी मराठी भाषिकांनी हिंदीची केलेली सेवा इतर राज्यांसाठी अनुकरणीय आहे. हिंदी समृद्ध करण्यात, तिच्या गद्य व कवितेत परिपक्वता आणण्यात मराठीपासून ते तेलगू, बांगला तसेच अन्य भारतीय भाषांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळेच ही भाषा राष्ट्रीय एकात्मतेच्या अभिव्यक्तीच्या रूपात समोर आली आहे.प्रारंभी खा. दर्डा यांनी काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांचे स्वागत पुष्पगुच्छ व ‘फ्रीडम आॅफ प्रेस’ची प्रतिकृति देऊन केले. (प्रतिनिधी)
भारतीय भाषांप्रति आवड, स्वाभिमान जागवा
By admin | Published: June 16, 2015 3:15 AM