योगेश मेहेंदळे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - 2022 सालची गोष्ट... पाच वर्ष कोमामध्ये असलेला एका गृहस्थ दक्षिण मुंबईतल्या हॉस्पिटलमधून बाहेर येतो आणि रस्त्यावरच्या एका माणसाला विचारतो, भारतीय जनता पार्टीचं किंवा काँग्रेसचं कार्यालय कुठे आहे सांगाल का? तो माणूस त्यांना नखशिखांत न्याहाळतो आणि म्हणतो आता भारतात एकच पक्ष आहे, तो म्हणजे मोदी जनता पार्टी. सांगू का पत्ता? नाव ऐकल्यासारखं वाटतंय असं म्हणत, ते म्हणतात सांगा...
असं करा, इथून सरळ जा. नरेंद्र मोदी सर्कल लागेल. तिथं डावीकडे वळा नरेंद्र मोदी महामार्ग लागेल. पुढे एक 50 मीटरवर तुम्हाला नरेंद्र मोदींचा भव्य पुतळा दिसेल. तिथे उजवीकडे गेलात की नरेंद्र मोदी नाना नानी पार्क दिसेल. त्या पार्कच्या समोर नरेंद्र मोदी खादी भांडाराची पाटी तुम्हाला दिसेलच. बस... त्याच इमारतीत मोदी जनता पार्टीचं महाराष्ट्र प्रदेश कार्यालय आहे.
अरे तुम्ही म्हणताय तिथं तर खादी ग्रामोद्योग भांडार होतं.
हो तेच ते, तुम्ही पण कुठल्या विश्वात राहता ओ... आता महाराष्ट्रात खादी नाय बनत. गुजरातमधून येते. आणि ती सगळ्या मॉलमधून नी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ऑनलाइन विकली जाते. गरजच नाय ना खादी भांडाराची. त्यामुळे आता तिथंच मोदी जनता पार्टीचं ऑफिस आहे.
बरं बरं... मला सांगा ही मोदी जनता पार्टी काय भानगड आहे???
ओ, नीट बोला... भानगड काय म्हणताय. हॉस्पिटलमधून बाहेर आलेले दिसलात म्हणून सोडून देतो, नाहीतर पोलिसांत तक्रार केली असती तर देशद्रोहाचाच खटला भरला असता. माहित्येय ना? 124 A... डायरेक्ट आत, नो जामीन... कन्हैय्या कुमार नी हार्दिक पटेलवर लागलेले हे कलम. सहा वर्ष झाली, हे पण माहीत नाही की अजून आतच आहेत, की जामीन मिळालाय... तेव्हा जरा जपून बोला.
बरं बरं... तुम्ही या मोदी जनता पार्टीचे कार्यकर्ते दिसताय...
असं काही नाही... घराबाहेर असताना, तेच बरं असतं... पण एकदा घरी गेलो ना की फेसबुकवर नी व्हॉट्स अॅपवर जाम खेचतो हा मी मोदींची... ते जाऊ दे, तुम्ही काय बोलत होता ते सांगा मोदी जनता पार्टीचं...
अहो, तसं अंधुकसं आठवतंय मला, 2017 मध्ये आजारी पडायच्या आधी थोडा अनुभव घेतलाय मी मोदींचा.
ते मुंबईत आले होते, आपल्या थोर राजाच्या स्मारकाच्या जलावतरण सोहळ्यासाठी... झालं का हो त्या थोर द्रष्ट्या महापुरुषाच्या स्मारकांचं उद्घाटन. बघता येईल का मला ते?
अरे काय योग्य विषय काढलात हो तुम्ही. अहो, झालं ते स्मारक तय्यार... जबरदस्त झालं आहे... उद्याच लोकार्पण सोहळा आहे. आज, त्याचीच तयारी सुरू आहे.
अरे व्वा... कोण येणारे उद्घाटनाला?
पंतप्रधान मोदीसाहेबच येणारेत उद्घाटनाला.
बरं बरं ठीक आहे. पण पुतळा अश्वारूढच आहे ना. नी हातात उंचावलेली भवानी तलवार असलेला?
छे हो... तुम्हीपण पाच वर्ष कोमात होतात, पण अकलेने 300 वर्ष मागे राहिलात बुवा...
म्हणजे काय, अहो असंच ठरलं होतं.. मला आठवतंय चांगलं.
अहो काका, त्यापेक्षा भव्य कल्पना आहे, आहात कुठे?
ते घोडा बिडा फार चिल्लर झालं हो... साक्षात पृथ्वीच्या गोलाचं शिल्प उभारण्यात आलंय, आणि त्यावर आपले साहेब बसलेले आहेत.
कोण शिवराय? पण त्यांना तर काय पृथ्वी ब्रिथ्वीचा मोह नव्हता... त्यांनी तर केवळ हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याची कास धरली.
काका... अहो छोट्याशा प्रदेशाची आस धरण्याला काय स्वप्न म्हणतात... आमच्या साहेबांनी संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करण्याचं आणि या भारताला पृथ्वीवर राज्य मिळवून देण्याचं स्वप्न बघितलं, त्यामुळे प्लॅन बदलला नी त्यांचाच पुतळा लावायचा ठरलं...
कोण साहेब हे?
अहो, दुसरं कोण? मोदीसाहेब...
अरे बापरे... अरबी समुद्रात पृथ्वीच्या डोक्यावर तलवार हातात घेतलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा?
बरोब्बर... फक्त एक करेक्शन करा...
त्यांच्या हातात तलवार नाहीये... चरखा आहे!