ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - देशातील सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि 'आयर्न मॅन' मिलिंद सोमणचा आज 51 वा वाढदिवस आहे. वय वाढत असले तरी मिलिंदने स्वतःला 'फिट अँड फाइन' ठेवले आहे. तरुणी- महिलांमध्ये आजही त्याची क्रेझ कायम आहे. मराठमोळ्या पठ्ठ्याला 51 व्या वाढदिवसाच्या या आयर्न मॅनला खूप खूप शुभेच्छा...
व्यायामाने कमावलेल्या पिळदार शरीरयष्टीने मिलिंदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या 'मेड इन इंडिया' या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलिंद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलिंद कारकीर्द तितकी यशस्वी झाली नाही. मात्र त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्याने मराठी, हिंदी आणि तमिळ सिनेमांमध्ये काम केले आहे.
1995 साली मिलिंद सोमणने 'टफ' या ब्रँडच्या शूजसाठी प्रसिद्ध मॉडेल मधू सप्रेसोबत केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली होती. या जाहिरातीसाठी दोघांनीही न्यूड फोटोशूट केले होते. त्याकाळी या फोटोशूटने इंटरनेटवर खूप धुमाकूळ घातला होता.
'आयर्न मॅन' म्हणून प्रसिद्धी
जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धापैकी एक असणा-या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत बाजी मारल्यानंतर मिलिंद सोमण हे नाव ख-या अर्थाने चर्चेत आले आणि प्रसिद्ध झाले. विशेष म्हणजे वयाच्या 50 व्या वर्षी मिलिंद सोमणने ही स्पर्धा जिंकली आहे. बॉलिवूड आणि मॉडेलिंग क्षेत्रातील उत्तम फिटनेस असलेला सेलिब्रिटी म्हणून मिलिंद सोमणची ओळख आहे, ती ओळख त्यानं अजूनही कायम ठेवली आहे.
ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या क्रीडाप्रकारांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेले असते.
स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जगभरातील तब्बल 2000 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
3.8 किलोमीटर पोहणे, 180.2 किलोमीटर अंतर सायकल चालवणे आणि 42.2 किलोमीटर अंतर धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते. स्पर्धकांना हे सर्व अंतर 16 तासांत पार करायचे होते. वर्ल्ड ट्रायलॉथॉन कॉर्पोरेशतर्फे आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा जगातील कठीण स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मिलिंद सोमणने पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्याने 15 तास आणि 19 मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली.