नाशिक : नाशिक शहरात हजार मुलांमागे असलेला मुलींचा जन्मदर ९२५ वरून ११०० वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांत बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्यानेच मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींचा घटता जन्मदर चिंतेचा विषय बनलेला आहे. नाशिक शहरात डिसेंबर २०१६ मध्ये मुलींचा जन्मदर हा हजार मुलांमागे ८८० इतका होता. तो आता मे २०१७ मध्ये ११०० इतका झाला आहे. नाशिक महापालिकेनेही गेल्या काही महिन्यांत बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय, सोनोग्राफी सेंटरचीही तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, गेल्या मार्चपासून मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ होत तो दर हजारी ११०० इतका झाला आहे. महापालिकेमार्फत शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञांकडून प्रसूतीसह गर्भपाताविषयीचा दैनंदिन अहवाल व्हॉट्सअॅप व ई-मेलवर मागविला जात असून, गर्भपातविषयक प्रत्येक गोळ्या-औषधांचा हिशेब घेतला जात असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे. महापालिकेने शहरातील सोनोग्राफी सेंटरची ७२ पथकांच्या साहाय्याने तिमाही तपासणीही सुरू केली आहे. शहरात सद्यस्थितीत ४२७ सोनोग्राफी सेंटर असले तरी २२९ सेंटर प्रत्यक्ष कार्यरत आहेत तर ३० तात्पुरत्या स्वरूपात बंद आहेत. १६८ केंद्र कायमस्वरूपी बंद आहेत. कुठे बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही डॉ. डेकाटे यांनी सांगितले. इन्फोलिंग गुणोत्तर प्रमाणमहिना प्रमाणडिसेंबर २०१६ ८८०जानेवारी २०१७ ९४०फेबु्रवारी ८९४मार्च १११०एप्रिल १२००मे ११००
शुभ वर्तमान : नाशिकमध्ये वाढला मुलींचा जन्मदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 10:34 PM