मुंबई : आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. नेहमीप्रमाणे तो शिवाजीपार्कवर झाला नाही, तर कोरोनामुळे शिवसेनेला दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये घेण्यात आला. याची चर्चा असतानाच अभिनेत्री दिशा पाटनी हिने दिलेली दसऱ्याची शुभेच्छा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.
दिशा पाटनी हीने सकाळी पावणे ११ च्या सुमारास एक ट्विट केले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. दसऱ्याच्या शुभेच्छा देताना तिने जे चिन्ह वापरले होते ते आपट्याच्या पानांचे किंवा अन्य कशाचे नव्हते तर ते शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे होते. महत्वाचे म्हणजे या फोटोवरील रंग हा भगवा होता. यामुळे सोशल मीडियावर या ट्विटचीच चर्चा होती.
आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असून त्यांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येते. विशेष म्हणजे दिशा आणि आदित्य यांचा वाढदिवस देखील एकाच दिवशी असतो.
धोनी या चित्रपटातील दिशाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती आणि त्यानंतर जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं. 'बागी-२' या सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली होती. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना प्रचंड भावली होती. ती नुकतीच मलंग या चित्रपटात दिसली होती. आता सलमान खानच्या राधे या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्य़ात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस, आदित्य ठाकरेंवर जी चिखलफेक झाली तिचाही चांगलाच समाचार घेतला. तसेच कंगना राणौंतलाही चांगलेच सुनावले. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कंगनावर निशाणा साधला. अनधिकृत बांधकाम मुंबईत करायची. हिंमत असेल तर पाकव्याप्त सोडा काश्मीरमध्ये अधिकृत बांधून दाखवा. मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले.
याचबरोबर, मला माझ्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे. छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय, सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या ते सगळ्या जगाने पाहिले असेही ते म्हणाले.