डहाणू/बोर्डी : जागतिक मराठी दिनानिमित्त मराठीचा जाज्वल्य अभिमान सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकार्यांनी शुभेच्छा संदेशाची देवणघेवण करून साजरा केला. यानिमित्त डहाणूतील विविध शाळांमध्ये मराठी भाषेची आणि कुसुमाग्रजांचा गोडवा गाणारे कार्यक्र म सादर करण्यात आले.दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासह मराठी चित्रपट पाहणे आणि गाणी ऐकण्याचा संकल्प अनेक नेटकर्यानी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. व्हॉट्सअप वापरणाऱ्या मजूर, गवंडी, रिक्षाचालक, बस व रेल्वेचे प्रवासी या पैकी अनेकांना हा दिवस साजरा करण्याचा उद्देश माहीत नव्हता मात्र मराठी बाणा दाखिवण्यासाठी शुभेच्छा संदेशाची देवाणघेवाण करीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. येथील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी चर्चासत्राद्वारे त्यांच्या ग्रंथ संपदेची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. बोर्डीतील सुपेह विद्यालयात प्राचार्या आशा वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करून ५ वी ते ७ वी इयत्तेच्या पाचशे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा सादर केली. या वेळी विविध सण व उत्सवाचे प्रतिबिंब दाखविणाऱ्या कार्यक्रमात कोळी गीत, लोकनृत्य यासह मराठी चित्रपटाच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. या वेळी उपस्थित पालकांनी पाल्यांचे कौतुक केले.दरम्यान या दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या डहाणू शाखे तर्फे २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महालक्ष्मी प्लाझा येथे कार्यक्र माचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रतिनिधी प्रवीण दवणे यांनी दिली. (वार्ताहर)
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 3:00 AM