नवी मुंबई : अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप बाजारभाव कमी झालेले नाहीत. एपीएमसीमध्ये १५० ते ७०० रुपये डझन दराने हापूस विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये ग्राहकांना यासाठी ३०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई कृृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी आंबा हंगामाची सुरवात निराशाजनक झाली आहे. एप्रिल अखेरीस गतवर्षी ९० हजार ते १ लाख पेट्यांची आवक होत होती. यावर्षी ५० ते ६० हजार पेट्यांचीच आवक होत आहे. सोमवारी ६७ हजार पेट्यांची आवक झाली आहे. यामध्ये २६० टन आंबा दक्षिणेकडील राज्यातून आला असून उर्वरित सर्व कोकणातून आला आहे. आंब्यावर काळे डाग असल्याने तो लवकर खराब होत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये हलक्या दर्जाचा हापूस १५० ते ३५० रुपये दराने तर चांगल्या दर्जाचा माल ७०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. देवगड हापूसला मोठी मागणी असते. परंतु यावर्षी तेथेही समाधानकारक उत्पादन झालेले नाही. तेथील हंगाम या महिन्याअखेर संपणार आहे. हापूसव्यतिरिक्त बदामी, लालबाग, गोळा, तोतापुरी, नीलम, पिवू या आंब्यांचीही आवक होवू लागली आहे. यावर्षी चांगल्या मालाचे प्रमाण कमी आहे. माल लवकर खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून बाजारभाव जास्त असल्यामुळे आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
हापूस आवाक्याबाहेरच
By admin | Published: April 21, 2015 1:33 AM