तुमचं आणि आमचं सेम असतं असं सांगत तुम्ही प्रेमाची नवी व्याख्या मांडलीत... तुम्ही झोपाळ्यावाचून झुलायला शिकवलंत... ‘इतकं दिलंत’ की साऱ्यांना ‘माणूस केलंत’, ‘दोन दिसांची रंगत संगत’ सांगून नात्यांची वीणही तुम्ही विणलीत... ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी’ म्हणत अख्ख्या साहित्यविश्वावर प्रीती केली... या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारे कविवर्य मंगेश पाडगावकर तुम्हीच अखेर मरणावर प्रेम करून साहित्यविश्वाला ‘सलाम’ करून अखेरच्या यात्रेला निघालात... पाडगावकर तुम्ही गेलात अन् नवकवींच्या साहित्यांचं विद्यापीठच काळाच्या पडद्याआड गेलं... शिवाय अवघ्या साहित्यविश्वाचा तुमच्या रूपातला कायम लकाकता शुक्रताराही निखळला.जिप्सी, विदूषक, सलाम, गझल, बोलगाणी अशा अनेकविध काव्यसंग्रहांची विपुलता महाराष्ट्राच्या ओंजळीत प्रेमाने घालून ८६ वर्षे पूर्ण करत तुम्ही बुधवारी सकाळी ९ वाजता सायनमधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्रातील तमाम रसिकांचा ठोका चुकला. ओठाओठांवर तुम्हीच शिकविलेल्या शब्दपुष्पांचा पाऊस पडला. अवघ्या महाराष्ट्राला कवितेचे वेड लावणाऱ्या विद्यापीठाला सायन येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप देताना अश्रूंचीही कविता झाली. वयाच्या १४ व्या वर्षापासून तुमच्या लेखणीतून उमटलेली प्रत्येक आडवी-उभी रेघ आज पोरकी झाली अन् काव्यवाचनाची तुमची शैलीही दृक्श्राव्य रूपात अजरामर झाली.
वेंगुर्ला ते मुंबई, एक सुंदर प्रवास....कविवर्य मंगेश पाडगावकर हे मूळचे कोकणातले. त्यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांमध्ये एम.ए. केले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी ‘तुज पाहिले, तव पाहिले’ ही कविता लिहिली. त्यानंतर सलग सात दशके त्यांच्या कवितांचा अखंड प्रवास सुरू होता. ‘धारानृत्य’ हा १९५० मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल, भटके पक्षी, बोलगाणी हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले. गझल, विदूषक आणि ‘सलाम’मधून त्यांनी राजकीय आशयाची, उपरोधाच्या आश्रयाने समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता लिहिली. मीरा, कबीर, शेक्सपिअर आणि तुलसीदास यांच्या कवितांचे भावानुवाद, बोरकरांची कविता व संहिता यांचे संपादन केले. त्यांच्या बालकविता विशेष गाजलेल्या असून, मराठी रसिक वाचकांच्या मनात या बालकवितांना विशेष स्थान आहे. पाडगावकरांनी ‘साधना’ साप्ताहिकात दोन वर्षे सहसंपादनाचे काम केले. त्याचप्रमाणे, रुईया महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले, मुंबई आकाशवाणी केंद्रावर प्रोड्युसर म्हणून सहा वर्षे काम केले. ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस’ युसिसमध्ये मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांची नेमणूक ही झाली आणि तेथूनच ते निवृत्त झाले. कविवर्यांचा सन्मान...गौरव अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)पुरस्कार‘सलाम’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०) महाराष्ट्र भूषण पुरस्कारपद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०१३)महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार (इ.स. २०१३)साहित्यिकांनी व्यक्त केल्या भावना....बापट, करंदीकर, पाडगांवकर या तिघांच्या जाण्याने दिग्गज कवींचे एक पर्व संपले. मंगेश पाडगावकरांना माझ्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला होता. हे मी माझे भाग्य समजतो. - सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाडगावकर यांच्या जाण्याने साहित्यक्षेत्रात फार मोठी हानी झाली आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव एक दोनदाच आला असेल, पण त्यांच्या कविता मात्र नेहमीच सोबत राहिल्या. - शेषराव मोरे, विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षबापट, करंदीकर आणि पाडगावकर या तिन्ही कवींनी कविता लोकप्रिय केली. तीनही कवी वेगवेगळ््या प्रवृत्ती आणि प्रकृतीचे होते, पण कवितेत त्यांचे योगदान अमूल्य होते. त्यांनी कविता घराघरात पोहोचवली.- संजय पवार, ज्येष्ठ साहित्यिकत्यांच्या कविता वाचनाचा आनंद आम्ही लुटला आहे. या पुढील पिढीला त्यांच्या कवितांचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवता येणार नाही. याचे दु:ख आहे. पाडगावकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवे. -रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ साहित्यिकआमचे वडील-मुलाचे नाते होते. मराठी कविता म्हणजे पाडगावकर असे एक समीकरण झाले होते. नवकवींवर प्रेम करणारे पाडगावकर होते आणि त्यांनी नवकवींना नैतिकतेचे धैर्य दिले.- अशोक बागवे, कवीदिलखुलास आणि वातावरण मोकळं करणारी पाडगावकर ही व्यक्ती होती. ते नेहमीच माझ्याशी छान गप्पा मारत. त्यांच्या कविता सगळ््या वयोगटातील लोकांना आवडत. त्यांनी अनुवादित केलेली शेक्सपिअरची नाटके ही अनेकांना भावली. मॅजेस्टिक गप्पांच्या माध्यमातून कवीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांची जास्त ओळख झाली. त्यामुळे त्यांच्या जाण्याचे दु:ख आहे.- अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन‘या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे’या पाडगावकरांच्या कवितांनी माणसाला जगण्यासाठीचा आशावाद दिला. त्यांच्या जाण्याने आज महाराष्ट्र पोरका झाला आहे. - वीरा राठोड, साहित्यिक‘साहित्य जल्लोष’ या कार्यक्रमामुळे पाडगावकर यांच्याशी जवळचा संबंध होता. पाडगावकरांबद्दल बोलायचे झाले तर ते हृदयस्थ होते. माणुसकीवर त्यांचे प्रेम होते. तीच माणुसकी त्यांच्या कवितांमधून जाणवायची. - अशोक मुळ््ये, डिंपल प्रकाशनपाडगावकरांचे निधन झाल्याचे वृत्त खूप वेदना देऊन गेले. त्यांच्यासोबत प्रत्येक क्षण, त्यांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. ज्या-ज्या वेळी त्यांची भेट झाली, त्यांनी पाठीवर हात फिरवला. - कविवर्य ना.धों. महानोरकविवर्यांच्या हयातीत ‘बालकोश’ हा १०० कवितांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला, याचा मला आनंद आहे. कवितेतून आसमंतात सुगंध पसरवणारा कवी पुन्हा होणे नाही. - विजया वाड, ज्येष्ठ साहित्यिका-------------------------दु:खी झालो... : पाडगावकरांच्या निधनाने मी स्वत: दु:खी झालो आहे. मराठी साहित्यातले मोठे आसामी होते. त्यांच्या कविता अनेकांसाठी प्रेरणादायी होत्या. -नरेंद्र मोदी, पंतप्रधानकविता जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात पाडगावकर यांचे मोठे योगदान होते. कविता जशी उत्कट प्रेमभावना समर्थपणे व्यक्त करण्यात यशस्वी ठरली. कवितेतील रसिकता जगण्यात जोपासणारा आणि तरुणाईच्या भावनांना शब्दरूप देणारा कवी आज हरपला आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीसोप्या, प्रसन्न आणि आशयघन कवितांच्या माध्यमातून पाडगावकर यांनी तीन पिढ्यांच्या हृदयावर अधिराज्य केले. अनेक प्रसिद्ध लेखकांच्या कृती मराठी भाषेत आणून त्यांनी मराठी साहित्य वारसा समृद्ध केला. त्यांनी लिहिलेली गीते अनेक वर्षांनंतरही तजेलदार व लोकप्रिय आहेत. राज्यातील सर्व लोकांच्या वतीने पाडगावकर यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.- विद्यासागर राव, राज्यपालमहाराष्ट्रभूषण कवी मंगेश पाडगावकर हे आधुनिक मराठी कवितेतचा अतुलनीय आविष्कार होते. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर ते अगदी अलिकडच्या आधुनिक मराठी कवितेतपर्यंत हा एक मोलाचा सेतू होता. त्यांच्या निधनाने आधुनिक मराठी कवितेतला एक अध्याय निमला.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसपाडगावकर यांनी अनेक पिढ्या रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने आज महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीतील जीवनगाणे थांबले असून, राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या प्रेम कवितांनी नव्या पिढीला संजीवनी देणारे आणि रसिकांमध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या पाडगावकर यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे.- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्रीहळुवार संवेदना जागविणारा कवी!मराठी भावकविता सर्वार्थाने समृद्ध करणारा, बालांपासून प्रौढांपर्यंतच्या साऱ्यांच्या हळुवार संवेदना जागविणारा, सारे आयुष्य कवितेत रमून मराठीचा काव्यप्रांत समृद्ध करणारा, अतिशय संवेदनशील भाषाप्रभू आणि कमालीची लोकप्रियता संपादन करणारा गीतकार म्हणून मंगेश पाडगावकरांना सारा महाराष्ट्र ओळखतो. आपला स्वाभिमान सतत जपत राहणारा आणि कोणतीही तडजोड न स्वीकारता, आपल्याच वाटेने चालत राहणारा हा कवी काळाच्या पडद्याआड जाण्याने, मराठी कवितेचे क्षेत्र त्याचे एक अमोल आकर्षण गमावून बसले आहे. पाडगावकरांच्या काव्यरचना मराठी मनात दीर्घकाळ स्पंदने जागवीत राहणार आहेत. ‘लोकमत’ परिवाराच्या व माझ्या वतीने मी त्यांना नम्र श्रद्धांजली अर्पण करतो. - विजय दर्डा, चेअरमन, ‘लोकमत’ समूह काही कलाकाराचे कधीच वय होत नाही. मंगेश पाडगावकर हेही त्यातलेच एक नाव. ते कायम तरुण होते, अगदी माझ्यापेक्षाही. ते कायमच उत्साही आणि चैतन्यपूर्ण असायचे. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फ्रेश होता. कवी म्हणून इतकी दशक सातत्याने लिहीत राहणे खूप मोठी गोष्ट आहे. रोज लिहायचे असे ते म्हणायचे. लिहायचा मी रियाज करतो, असे पाडगावकरांनी सांगितले होते. पुढच्या पिढीसाठी हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. रोज लिहिते राहणे हे महत्त्वाचे आहे. शिवाय ‘परफॉर्मर कवी’ म्हणून त्यांनी कवितेला जसे रंगमंचावर सादर केले, ते त्यांचे मराठी कवितेसाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे, असे मी मानतो. त्यामुळे पुस्तक वाचण्यापलीकडे असणाऱ्या सामान्यांना कविता ऐकायला मिळते, याचा आनंद वेगळा असतो. अशी माणसे जातच नाहीत, अगदी परवा मी लिहिलेय की, ‘आकाश के उस पार भी आकाश है’ आकाशाच्या पलीकडची मंडळी ही तशीच असतात. - सलील कुलकर्णी, गायक-संगीतकार.बाबांचा आणि पाडगावकरांचा स्रेह असीम असाच होता. त्याला वसंत बापटांच्या मैत्रीची झालर लाभलेली होती. बापट, पाडगावकर, करंदीकर यांनी महाराष्ट्रात काव्यवाचनाचे जे पर्व घडवले, ते सगळेच जाणतात. पाडगावकर मिश्कील स्वभावाचे होते. आयुष्याच्या संध्याकाळी केवळ लेखनावर उपजीविका करण्याचा त्यांचा निर्णयही असाच धाडसी होता. त्यांनी तो घेतला, तेव्हा अनेकांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर ते ठाम राहिले, ते अखेरपर्यंत.- जयश्री काळे, विंदा करंदीकर यांच्या कन्या.पाडगावकरांच्या जाण्याने साहित्य विश्वाचे खूप नुकसान झाले आहे. ते शब्दांचे देव होते, ते खूप अप्रतिम लिहायचे. माझे भाग्य आहे की, त्यांच्यासोबत काम करायला मिळाले. कवीच्या पलीकडे जाऊन पाडगावकर चांगली व्यक्ती होती. - लता मंगेशकर, गायिकापाडगावकरांनी सात दशके कविता आणि अनुवाद करून साहित्याला त्यांनी अलौकिक योगदान दिले. त्यांच्या जाण्याने काव्य जगतात पोकळी निर्माण झाली आहे.- वसंत डहाके, ज्येष्ठ कवीपाडगावकरांची ‘या जन्मावर या जगण्यावर’ कविता आताही वाचली किंवा ऐकली की, जगण्याची एक नवी उमेद मिळते. -अशोक नायगावकर, ज्येष्ठ कवीकविता हा प्रकार त्यांनी सगळ््यांच्या तोंडी त्यांनी रुळवला. त्यांच्या कविता नवपिढीला जगण्याचा नवा अर्थ कायमच देतील.- अनिल अवचट, ज्येष्ठ लेखक‘शतदा प्रेम करावे’ या काव्यरचनेतून सगळ््यांनाच आनंदाने जगण्याची प्रेरणा मंगेश पाडगावकरांनी दिली. पाडगावकरांच्या साहित्यकृतीतून त्यांचे दलितांवरही प्रेम होते हे दिसून येते. - खा. रामदास आठवले, आमचे शालेय जीवन पाडगावकरांच्या कवितांमुळे प्रफुल्लित झाले होते. त्यांच्या कविता व गाणी अजरामर झाली. - पंकजा मुंडे, ग्रामविकास व जलसंधारणमंत्री
आशयगर्भ व गेय कवितांद्वारे निसर्ग कवी म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली. महाविद्यालयीन तरुणांमध्ये त्यांचे एक वेगळेच स्थान आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्रीभोलानाथसारख्या कवितेने त्यांनी बालमने जिंकली, तर ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’मधून तरुणांच्या हृदयात हात घातला होता. - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेता, विधानसभाअजरामर कवितांनी आणि अविट गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे पाडगावकर यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. - छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्रीपाडगावकर यांच्या निधनाने सोप्या शब्दांत महान आशय व्यक्त करणारा कवी हरपला आहे. - रावसाहेब दानवे पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्षपाडगावकर एक उत्तम कवी तर होते. कविता सादरीकरणाची त्यांची शैलीदेखील वैशिष्ट्यपूर्ण होती. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
पाडगावकर यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रातील शुक्रतारा निखळला आहे. पाडगावकर त्यांच्या कवितांमधून ते यापुढेही आपल्या सतत स्मरणात राहतील.- दिलीप कांबळे, राज्यमंत्री, सामाजिक न्याय, ‘सांग सांग भोलानाथ’सारख्या सुंदर बालकवितेतून निष्पाप मनाचा अविष्कार करणारे, ‘शुक्रतारा मंदवारा’ सारख्या हळुवार कवितेतून पे्रम व्यक्त करणारे पाडगावकरच ‘सलाम’सारख्या कवितेतून प्रत्येकाच्या भ्याडपणावर निर्भीडतेने नेमके बोट ठेवतात. - राम नाईक, राज्यपाल, उत्तरप्रदेश‘मरण येणार असेल तर येऊ द्यावं, जमलंच तर त्याला लाडाने जवळ घ्यावं,’ अशी मरणाला जवळ करणारी प्रतिभा त्यांच्याकडे होती. अरुण दाते, सुरेश वाडकर अशा अव्वल गायकांनी पाडगावकरांचे शब्द तितक्याच गोड आवाजात सर्वदूर पोहोचवले. पाडगावकरांचे व्यक्तिमत्त्व कायमच अजरामर राहील.- श्रीपाल सबनीस, नियोजित संमेलनाध्यक्ष, ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन
मी मंगेश पाडगावकर यांच्यासह ‘माझे जीवनगाणे’ हा कार्यक्रम सादर करायचो. कार्यक्रम सुरू होताच सगळा माहोल ‘पाडगावकर’मय होऊन जायचा. कवितांची पुस्तके ते कायम स्वत:जवळ ठेवत. साहित्यक्षेत्रात महत्त्वाचे योगदान असूनही त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असायचे. अशा मोठ्या कलाकाराच्या जाण्याने एक शुक्रतारा निखळला आहे.- अजय धोंगडे, तबलावादकसत्यम् शिवम् सुंदरम् या मूल्यांवर आधारित आयुष्यभर पाडगावकरांनी कविता लिहिल्या. सर्व मराठी कवितांचे ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणजेच पाडगावकर. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या कविता आवडत. दोन पिढ्यांनी त्यांची गाणी म्हणतच प्रेम केले. - अशोक बागवे, कवीमाझे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा ‘ध्यानस्थ’ या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी पाडगावकरांनी प्रस्तावना लिहिली. जगण्यावर त्यांनी भरभरून प्रेम केले. त्यांचे अनेक रेकॉर्डिंग बघण्याची, त्यांच्या मुलाखती घेण्याची मला संधी मिळाली.- प्रवीण दवणे, कवी