पराभवाच्या भीतीमुळेच विजयी होणाऱ्या काँग्रेस उमेदवारांचा भाजपाकडून छळ, काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 03:40 PM2024-03-28T15:40:19+5:302024-03-28T15:42:40+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मात्र रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसच्यारामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मात्र रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे या निवडणुकीत पारडे जड आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात साम दाम दंड भेद सूत्राचा वापर भाजपने सुरू केला आहे, आसा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या देशाच्या लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणांचे निष्पक्ष वागणे अपेक्षित असताना यंत्रणा या विरुद्ध आचरण करत आहे. त्यामुळेच रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र समितीने रद्द केले आहे. लोकशाही मार्गाने, जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक लढणाऱ्या रश्मी बर्वे यांच्यावर आज अन्याय झाला आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, कायद्यानुसार १७ फेब्रुवारी २०२० ला रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले होते, त्यामुळे जात पडताळणी समितीला हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. समितीने अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हा निकाल दिला आहे, त्यामुळे या समिती वर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.
जी समिती जात प्रमाणपत्र देते ती समिती जात वैधता प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही. जात प्रमाणपत्राबाबत समितीने २० मार्च रोजी नोटीस दिली आणि आठ दिवसात हे प्रमाणपत्र रद्द केले. नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले होते, सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित राहून पाच वर्ष खासदारकी पदावर राहिल्या, आणि आता भाजपने उमेदवारी दिली. इतकं झालं तरी काँग्रेस लढत राहणार, न्यायालयात आम्ही दाद मागणार, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.