मुंबई - भाजपने लोकसभा निवडणुकीत वयाचे निकष लावत अनेकांना तिकिट नाकारले होते. तोच निकष आता विधानसभेला लावण्यात येत असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत ७५ वर्षीपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उमेदवारीचे काय होणार अशी चर्चा पहायला मिळत आहे.
फुलंब्री मतदारसंघाचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उमेदवारीवरून बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहे. वयाचे निकष लावत विधानसभा निवडणुकीत बागडे यांना यावेळी थांबण्याचे आदेश पक्षाकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी ७५ वर्षीपेक्षा अधिक असणाऱ्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जाहीर केले आहेत. त्यामुळे बागडे यांची उमेदवारी पुन्हा चर्चेची विषय ठरत आहे.
बागडेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण
त्यामुळे यावेळी ७५ वर्षीय बागडे यांच्या उमेदवारीचे काय होणार याची चिंता त्यांच्या समर्थकांमध्ये पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आता बागडे यांच्या उमेदवारी बाबत पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.